Monday, 11 May 2020

जैसे थे..!!

बर चाललंय म्हणता म्हणता सगळ्यालाच पुन्हा ब्रेक लागला

दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न पुन्हा आ वासून उभा राहिला

कोण्या एका बाहेरल्या पाहुण्यामुळ ही अवस्था झाली

साला आपली परस्थिती मात्र जैसे थे च राहिली...||


लै वर्षांनी गड्या रिकाम्या हातानं गावाकडची वाट धरली

खायाला काय, करायचं काय, लेकरांच काय हीच कोडी सतत समोर यायला लागली

बोटं दाखवायला समदी पुढं, काम द्यायला मात्र हाताची घडी

साला आपली मात्र परस्थिती मात्र जैसे थे च राहिली...||


काल पातूर बघितलेल्या सपनांचा पाक चेंदामेंदा झाला

चटके खात पायपिटीचा शेवटचा दिवस म्हणतं प्रवास तसाच चालू राहिला

साहेब व्हायचं स्वप्न बघणारी लेकरं परत दुसऱ्यालाच सलाम करतील ही धाकधूक वाढली

साला आपली परस्थिती मात्र जैसे थे च राहिली…..||


सापडलेली जगण्याची लय पुन्यांदा हवेत विरून गेली

आजचा दिस दोन वेळच खाऊन जाऊदे म्हणतं हात जोडायची वेळ आली

बोचकी बांधून बाहेर पडताना हिथ आपल काय नाई ह्याची खात्री झाली

साला आपली परस्थिती मात्र जैसे थे च राहिली….||


अखेर दारात पाय पडला तवा कुठं जीवात जीव आला

लेकरानी घट्ट धरलेला अंगठा रडायला भाग पाडून गेला

पून्यांदा शहराची वाटच नग म्हणतं एकदाची घरी पाठ टेकली

साला आपली परस्थिती मात्र जैसे थे च राहिली..||


कवी - अमेय ओक  




No comments:

Post a Comment