Showing posts with label विठ्ठल रुख्मिणी. Show all posts
Showing posts with label विठ्ठल रुख्मिणी. Show all posts

Monday, 1 March 2021

पाऊले चालती पंढरीची वाट

पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची तोडूनिया गाठ

गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने
पडता रिकामे भाकरीचे ताट
पाऊले चालती … 

आप्त‍ इष्ट सारे सगेसोयरे ते
पाहुनिया सारे फिरविती पाठ
पाऊले चालती … 

घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट
पाऊले चालती … 

मन शांत होता पुन्हा लागे ओढ
तस्सा मांडी गोड संसाराचा थाट
पाऊले चालती … 

https://dc.kavyasaanj.com/2021/03/paule-chalati-pandharichi-vaat.html

कवी - दत्ता पाटील





Saturday, 4 January 2020

अठ्ठावीस युगांचं एकटेपण

देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रख्माय शेजारी
नुस्ती वीट



मी म्हणालो ऱ्हायलं
रख्माय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं


पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून



आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही



रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला



मी परत पाह्यलं
खात्री करून घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं



दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं जरा
होत नाही



कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही



खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले



आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही



आज एकदमच मला
भेटायला धावून आलं

अठ्ठावीस युगांचं एकटेपण

कवी - अरुण कोलटकर (‘चिरीमिरी’, प्रास प्रकाशन)https://dc.kavyasaanj.com/2020/01/athavis-yug-kolhatkar-kavita.html





"अठ्ठावीस युगांचं एकटेपण" हि कविता अरुण कोलटकर ह्यांच्या ‘चिरीमिरी’ ह्या पुस्तकातून घेतली आहे. त्या पुस्तकाची लिंक सोबत देत आहे :