Showing posts with label कविता महाजन. Show all posts
Showing posts with label कविता महाजन. Show all posts

Tuesday, 29 November 2022

कागदाचे पक्षी

तर या क्षणी
कागदांच्या लगद्यापासून बनवलेल्या
पक्ष्यांची एक माळ आहे
वाऱ्यावर ती किंचित हलतेय
जागच्या जागी

कागदांवर लिहिली असतील कुणी
प्रेमपत्रं अज्ञात भाषालिपीत
लिहिल्या असतील कविता
किंवा हिशेब
किंवा सजा सुळावर चढवण्याची
… सारं पोटात घेऊन
झुलताहेत हलकेच रंगीत पक्षी

पक्षी पिंजऱ्यात नाहीत
की त्यांची मुक्तता करता यावी
पक्षी स्मरणात नाहीत
की त्यांना विस्मरणात धाडता यावं
पक्षी कागदाच्या लगद्यात आहेत

झाडाचा कागद कागदाचे पक्षी
हा न्यायच असेल कदाचित
मला मधल्यामध्ये
अपराधी वाटतंय उगा
 
https://dc.kavyasaanj.com/2022/11/kagadache-pakshi-kavita-mahajan.html

- कविता महाजन





Thursday, 7 April 2022

भेटूया कधीतरी

आपण दुसऱ्या विषयांवर बोलतो
तिसऱ्या चित्रांविषयी
चौथ्या कवितांविषयी
कितव्या तरी पुस्तकाच्या
प्रस्तावनेविषयी
बोलतो

हसतो बोलताना आपापल्या जागेहून
फोन धरलेल्या हाताची बोटं उत्सुक
दुसऱ्या हाताच्या बोटांमधल्या रिकाम्या जागा
गुंफून भरून काढण्यासाठी
पायांना धावत सुटावं वाटतंय तुझ्याकडे

भेटूया कधीतरी… असं नेहमीचं म्हणून
आपण फोन ठेवतो
उठून कामाला लागण्याआधी
बोलायचे होते जे ते शब्द भवताली जमलेले
तरंगताहेत हिरमुसून अधांतर
गोळा करून ठेवेन

आपण न उच्चारलेल्या शब्दांची रास
अशी किती काळ वाढतच राहणारेय?
निदान आतातरी पाहा एकदा मान वळवून
पहिल्या शब्दाकडे
मग ठेव माझ्या तळहातावर
निखाऱ्याचं फूल.
 
https://dc.kavyasaanj.com/2022/04/bhetuya-kadhitari-kavita.html

कवयित्री : कविता महाजन





Friday, 25 March 2022

उचकी

कोण माझी आठवण काढतंय इतक्या तीव्रतेने
मित्र की शत्रू?
मित्र ढगात पोहोचला आहे
स्वर्गात वा नरकात
त्याच्या पापपुण्याईने.

शत्रू आहे अजून मातीवरचं एक ढेकूळ
कोण माझी आठवण काढतंय
इथून वा तिथून
तिथून वा इथून?

ब्लॉक केलेले कोळसे पेटलेत
की धुमसताहेत अनफ्रेंड केलेले लोक
की रुसलेत फ्रेंड्स
पुरेसं लक्ष न दिल्याने?
कुणाच्या आहेत या उचक्या
ज्या सतत लागताहेत
गिळू देत नाहीत अन्नाचा घास
कष्टाने मिळवलेला
उतरू देत नाहीत घोट घशाखाली
साध्या निर्मळ पाण्याचा
बघ म्हणतात छताकडे
छतापलीकडच्या आभाळाकडे
तरी थांबत नाही उचकी

उचकी लागणे म्हणजे छाती व पोट यामधील पडदा
आणि बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होणे
व त्याचवेळेस स्वर यंत्रातील स्वरतंतू
व्होकल कॉर्ड एकमेकांजवळ येणे
मी वाचते माहिती उचक्या देत देत
उचकी म्हणजे असतो
स्वरतंतू जवळ-जवळ आल्यामुळे आवाज
हे वाचून देखील थांबत नाही माझी अंधश्रद्ध उचकी

माझ्या देहातून मी खेचून काढते प्रेतं
एक प्रेत धास्तीचं ज्यानं धमकी ऐकली होती
एक प्रेत भीतीचं ज्यानं दहशत सोसली होती
एक प्रेत अश्रूचं ज्यानं दु:खाचा चेहरा देखला प्रत्यक्ष
एक प्रेत प्रेमाचं ज्याला मृत्यूने कुजवलं
एक प्रेत आकर्षणाचं, ज्याची
आकर्षणवस्तू होती कमजोर आत्यंतिक
मी प्रेतमुक्त
होते जगण्याला मोकळी
व्याकरणाच्या नियमात न बसणारा
नवा शब्द

मी स्वागत करते उचकीचं
की बाई, स्वार्थहीन स्वरतंतु जवळ-जवळ आल्यामुळे
जन्मली आहेस तू.
 
https://dc.kavyasaanj.com/2022/03/uchaki-by-kavita-mahajan.html

कवयित्री - कविता महाजन





Monday, 21 June 2021

दुखावलेला यार

शत्रूहूनही घातक असतो
दुखावलेला यार
त्याला आरपार
माहीत अस्तोय आपण
आईहून जास्त बापाहून जास्त

सहज क्रौर्याने
नक्षीदार मुठीची दातेरी सुरी
पोटात खुपसून गर्रकन फिरवतो तो
फिरवत राहतो
आतल्या आत आतल्या आत
आतड्याचा पीळ कापत
हजारो तुकडे करतो
धारदार यार

शत्रूवर पलट वार
करता येतो
याराकडे फक्त बघता येतं
दुखावलेल्या नजरेने

https://dc.kavyasaanj.com/2021/06/dukhavlela-yaar-kavita-mahajan.html

कवयित्री - कविता महाजन





Saturday, 26 December 2020

भेसळ स्वप्नांची

झोपेत सालं कोण करतंय भेसळ स्वप्नांची
स्वप्नांमध्ये कोण मिसळतं कात्र्या
कुठूनही काहीही कापून टाकणाऱ्या
मिठी कापतात चुंबन कापतात आणि
कमरेखालचं आणि वरचं शरीर कापून ठेवतात

जिभेवर थर चढवतात
आधी पांढरे मग पिवळे मग काळे
सुतं काढतात प्रेमाची प चे पन्नास तुकडे
र तर आधीच अर्धा
म ला अंगावर घोंगडं टाकून बडवतात बडव बडव

एकही नंबर नसतो जो डायल करावा
एकही नाव नसतं पुकारायला
कित्ती कापूस पिकलाय कित्ती कानांत बोळे

झोपेत तहान लागते सारखी
झोपेत भूक लागते सारखी
झोपेत आवळतात मुठी घातल्या जातात लाथा
अधांतरात सगळं
सकाळी फक्त अगणित सुरकुत्या चादरीवर
चादर झटकली की त्या सगळ्या कपाळावर
येऊन बसतात आठ्या बनून

झोपेच्या गोळीने घट्ट आटून येतो काळ
गर्द होतात स्वप्नं
आता स्वप्नातही दिसत नाही प्रियकर
आता स्वप्नातही येत नाही कुणाचा फोन
भिंतींच्या आरपारचं दिसायचं स्वप्नात
सीमांच्या पल्याडचं दिसायचं

किती बारीक कातरते ही कात्री
कळत नाही की कातरलं ते स्वप्नच आहे
की झोपेचे आहेत हे आखीव कागद
की माझं अख्खं शरीरच आहेय हे
की
कातरून ठेवलीये कुणी पातळ रेष
वास्तव आणि स्वप्नातली

नासमझ
सारं

https://dc.kavyasaanj.com/2020/12/bhesal-swapnanchi-by-kavita-mahajan.html

कवयित्री - कविता महाजन 





Thursday, 13 August 2020

माहीत होतं का तुला

ओठांमध्ये किती उत्सुक चुंबनं लपलेली असतात
माहीत होतं का तुला?
माहीत होतं का किती शहारे लपलेले असतात त्वचेआड
आणि तरारून उमलून येतात क्षणार्धात एका स्पर्शानं?

डोळ्यांमध्ये किती स्वप्नं असतात जांभळीनिळी
शब्दांच्या षटकोनांचं पोळं किती ओथंबलेलं असतं
किती थेंब शहद टपकत राहील तुझ्या जिभेवर
माहीत होतं का तुला?

नखांमध्ये किती शुभ्रकोवळ्या चंद्रकोरी
होत्या थांबून
स्तनांवर उगवायला चढत्या रात्री;
केसांमध्ये लपलेल्या किती गारओल्या सावल्या
तुला विसावण्यासाठी;
हे माहीत होतं कधी आधी?

माहीत होतं की उसळेल कारंजं अनाम वासांचं
श्वासांना वेडंपिसं करत?
माहीत होतं की दातलशील दाणा
तेव्हा उतू जाईल सुख?

किती रे अडाणी तू
माझ्यासारखाच
होतास
तेव्हा

कवयित्री - कविता महाजन