Showing posts with label मैत्री. Show all posts
Showing posts with label मैत्री. Show all posts

Wednesday, 10 June 2020

अशी एक तरी मैत्रीण असावी


एक तरी अशी मैत्रीण असावी,
आपल्याला आपलं म्हणणारी....
आपण न पाहता पुढे गेलो तरी,
मागून प्रेमाने आवाज देणारी....
अशी एक तरी मैत्रीण असावी....


आपल्याला हसवणारी ,वेळप्रसंगी
आपल्यासाठी हसणारी....
न सांगताही सगळं समजून,
डोळ्यातील अश्रू पुसणारी....
अशी एक तरी मैत्रीण असावी....

स्वतःच्या घासातला घास,
आठवणीने काढून ठेवणारी....
आपल्या वेड्या मैत्रिणीची,
 प्रेमाने समजूत काढणारी....
अशी एक तरी मैत्रीण असावी....

यशाच्या शिखरावर पोहचल्यावर,
अभिमानाने पाठ थोपटणारी.....
वाकडं पाऊल पडताना मुस्काटात,
मारायला ही पुढे-मागे न पाहणारी....
अशी एक तरी मैत्रीण असावी....

आपण सोबत नसताना नुसत्या,
आठवणीनं व्याकुळ होणारी.....
माणसांच्या घोळक्यात आपल्याला,
सगळीकडे सैरभैर शोधणारी.....
अशी एक तरी मैत्रीण असावी....

खरंच अशी एकतरी मैत्रिण असावी,
आपल्याला जीवा-भावाची वाटणारी.....
सुखात साथ देणारी आणि ,
दुःखात हातात हात देणारी......
अशी एक तरी मैत्रीण असावी....

कवयित्री - कावेरी डफळ




Sunday, 31 May 2020

मैत्री


जीवनाच्या वाटेवर मित्र भेटतात
सुखाची सोबत क्षणाची देतात
क्षणात भेटून निघून जातात
आठवणीत मात्र तेच राहतात
मनाच्या कोपऱ्यात ठसा उमटवतात
मैत्रीची जाणीव ठेवून जातात
काही इच्छा मोठ्या असतात
अर्धवट ठेऊन निघून जातात
काही काळाने स्मरणी येतात
डोळ्यात अश्रू हळूच देतात
पण तेव्हा ते या सृष्टीत नसतात
जागाच्या पडद्याआड विरून जातात
आणि मैत्रीच्या नात्यात अमर होतात.

कवयित्री - कावेरी डफळ





Saturday, 16 May 2020

गैरसमज

मैत्री केली तुझ्याशीच
प्रेम मात्र कधीच नव्हतं
तू असा अर्थ घ्यावास
अस कधीच घडलं नव्हतं
प्रेमापेक्षा पवित्र नातं
फक्त आपल्या मैत्रीचं होतं
या व्यतिरिक्त काहीच नव्हतं
तू उगीचच माझ्यात गुंतत गेलास
मला असं कधी वाटलंच नव्हतं
विसरण्याची सुरुवात तू करावीस
कारण....
मला कधी काही आठवलंच नव्हतं.

कवयित्री - कावेरी डफळ




Sunday, 15 March 2020

माझ्या मित्रा


ऐक ना,
मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ,
अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ
बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा
तीव्रमधुर तिथला वाऱ्याचा वावर
आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही
कितीदा पाह्यलेय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही !

आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही
पण थांब, घाई करू नकोस,
अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नाही.

हे ऐकताना हसशील, तर मर्द असशील;
स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी,
तर प्रेमिक असशील,
समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात
धपापतेय माझे काळीज,
तर मग तू कोण असशील ?

स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील,
हाती देशील तर पती असशील,
आणि चालशील जर माझ्यासोबत
त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे
समजून हेही, की ते हाती येईल, न येईल,
पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे
आणि माझा विश्वास, की माझे मलाच लढता येईल,
तर मग तू कोण असशील ?

मित्र असशील माझ्या मित्रा

कवयित्री - अरुणा ढेरे

http://kavyasaanj.com





Friday, 7 April 2017

प्रेम







प्रेम म्हणजे एक गंमत
तिखट - गोड क्षणांची सुरेख संगत

प्रेम म्हणजे एक मजा
परीक्षा नावाच्या गोष्टीची सजा

प्रेम म्हणजे एक अपेक्षाभंग
अशक्य मिळवण्यात सदैव दंग

प्रेम म्हणजे एक गार वारा
उन्हाळ्यात पाऊस अन गारा

प्रेम म्हणजे एक संधी
कधीतरीच येते दुःखाची मंदी

प्रेम म्हणजे एक सुगंध
अनपेक्षित सुखाचा ऋणानुबंध

प्रेम म्हणजे एक आश्चर्य
कधीच न कळणारे तात्पर्य

प्रेम म्हणजे एक व्यथा
जगण्या - मरण्याची छान कथा

प्रेम म्हणजे एक आशा
पदरी न पडण्याची निराशा

प्रेम म्हणजे एक टोळका
अनेक विचारवंताचा घोळका

प्रेम नावाची गोष्ट
अगदीच क्लिष्ट
काहींसाठी स्पष्ट तर
काहींसाठी कष्ट!!!

- धनंजय चौधरी




Saturday, 27 December 2014

कधीतरी आठवण यावी

कधीतरी आठवण यावी
एवढे देखील उरलो नाही 
की  आठवण्यासाठी तुमच्या 
आठवणींत मुरलो नाही 

कधीतरी मैफिल जमावी 
निदान नव्या जोडीदारांची 
अन त्यात एखाद्या शब्दांनी 
आमची आठवण यावी 

रमून जावे शब्दा - शब्दांनी 
जुन्या दिवसांत कधीतरी 
का जुनी मैत्री 'जुनी झाली '
म्हणून पडताळात टाकले तुम्ही ?

कधी तरी -  कुठे तरी 
नाही तर एखाद्या नाक्यावरी 
एखादा टोळका पाहुनी 
थोडीसुद्धा आठवण येत नाही ?

एखाद्या सिनेमाची गाणी 
आठवण करते सिनेमा पाहिल्याची 
होतो सोबत सिनेमा पाहताना तरी 
किमान एवढी तरी आठवण व्हावी 

पाहताना जुने फोटो चुकून कधीतरी 
सोबत पाहिलेली गड-किल्ला-लेणी 
पावसातली सहल धबधब्याची 
आठवत नाही का गमती - जमती ?

मोडलेला 'सिग्नल' आणि 'ट्रीप्सी'
भन्नाट वेग अन 'साहेबाची शिट्टी'
थांबल्यावर चौकात एखाद्या सिग्नलपाशी 
खरंच तुम्हाला आठवत नाही काही ?

घेताना चहा एखाद संध्याकाळी 
वर येताना वाफा कपातूनी 
तुम्हा आठवण करून देत नाही 
बिलावरून भांडण अन चहाची टपरी ?

खरंच तुम्हाला आठवण होत नाही 
की  आठवणींत 'रमणं' सहन होत नाही (?)
दुरावा नात्यातला जपतोय आम्ही 
कधीतरी आठवण तुम्हालादेखील व्हावी !!!

- धनंजय चौधरी 







[Published in "Art Gallery", Zankaar 2012,MESCOE Pune]

Sunday, 21 September 2014

मतप्रवाह

             आज इथे उद्या तिथे
             जाउ तिथे खाउ
             कार्यकर्ते मात्र इथे
             उगाच करतात बाउ

             सकाळ अन् संध्याकाळ
             शब्दांचे फुले वाहू
             फक्त एकदा मत द्या
             पुन्हा वळून नका पाहु

             आश्वासनांच्या पुड्या
             'विकास' देखील दाउ
             भूमिपूजन, उद्घाटन, मेळाव्यातून
             दांडगा 'जन-संपर्क' साधू
KavyaSaanj DC मतदान मतप्रवाह

             अमक्क करू, ढमक्क करू
             याव करू अन् त्याव करू
             चांगल करू, छान करू
             मतदारसंघाचं 'नाव' करू

             पत्रके वाटू रॅली करू
             सगळयांना एक नारा देऊ
             करायचं किंवा नाही करायचं
             ते निवडून आल्यावर पाहु

             'आचारसंहिता' आपली वेगळी
             आचार आपला वेगळा दाउ
             मतांचं गणित जुळवण्यासाठी
             जातीचं समीकरण वापरुन  पाहू

             युती, आघाडी , आलियन्स
             वेगवेगळी नावे देऊ
             नाही जमल्यास तसं काही
             एकमेकांची "धुणी" धुवू

             प्रचार, प्रसार आणि 'प्रसाद'
             यांवर पाण्यासारखा पैसा वाहू
             निवडून आल्यावर मात्र
             आपलं घोडं गंगेत न्हाऊू !

https://dc.kavyasaanj.com/2014/09/dcElectionSpecial.html
            - धनंजय चौधरी