Saturday 9 May 2020

एकांत माझ्या जीवनी

एकांत, याचेही आपले असे एक विश्व आहे
भावनांच्या जंजाळात तोही तितकाच त्रस्त आहे

कधी भेटे मला सहजची दुःख त्याचे घेऊन
अंधाराच्या सोबतीने रात्र त्याची व्यस्त आहे

माणसांच्या भरल्या बाजारी हा एकटाच आला फिरून
म्हणे त्या गर्दीमध्ये शांतता दुरापास्त आहे

इतकेच काय जेव्हा हा परतला मैफिलीत रंगून
मुखवट्यांच्या स्पर्धेत म्हणे जीवन एक फार्स आहे

कधी अचानकच उगवे हा सुखाचे भरते येऊन
म्हणतो आनंदाच्या डोहांचा तळ सुंदर आहे

कधी नकळत आठवणीत तिच्या विसरे हा भान
म्हणे भूतकाळाच्या शिंपल्यांचा रंग मस्त आहे

वर्तमानाच्या मिठीत जेव्हा ना दिसे तिचे स्थान
म्हणे जीवनात इंद्रधनूच्याही बेरंगीच अस्त आहे

कधी रमता भविष्याच्या मोहात भुले हा अजाण
अशक्य या स्वप्नांच्या वारुंचा वेग थोडा जास्त आहे

निष्ठावंत हा भलताच न जाई कधी सोडून
मनाच्या गाभारी सदैव याचा वास आहे

गर्दीत मी असतानाही सदैव तो आसपास आहे
एकांत माझ्या जीवनी थोडासा खासच आहे

एकांतास माझ्या जरी या एकटेपणाचा शाप आहे
अज्ञाताच्या सोबतीची रोजच त्याला आस आहे..

एकांत माझ्या जीवनी थोडासा खासच आहे...

कवी - तृषांत (तेजस घोरड)




No comments:

Post a Comment