Saturday 27 December 2014

कधीतरी आठवण यावी

कधीतरी आठवण यावी
एवढे देखील उरलो नाही 
की  आठवण्यासाठी तुमच्या 
आठवणींत मुरलो नाही 

कधीतरी मैफिल जमावी 
निदान नव्या जोडीदारांची 
अन त्यात एखाद्या शब्दांनी 
आमची आठवण यावी 

रमून जावे शब्दा - शब्दांनी 
जुन्या दिवसांत कधीतरी 
का जुनी मैत्री 'जुनी झाली '
म्हणून पडताळात टाकले तुम्ही ?

कधी तरी -  कुठे तरी 
नाही तर एखाद्या नाक्यावरी 
एखादा टोळका पाहुनी 
थोडीसुद्धा आठवण येत नाही ?

एखाद्या सिनेमाची गाणी 
आठवण करते सिनेमा पाहिल्याची 
होतो सोबत सिनेमा पाहताना तरी 
किमान एवढी तरी आठवण व्हावी 

पाहताना जुने फोटो चुकून कधीतरी 
सोबत पाहिलेली गड-किल्ला-लेणी 
पावसातली सहल धबधब्याची 
आठवत नाही का गमती - जमती ?

मोडलेला 'सिग्नल' आणि 'ट्रीप्सी'
भन्नाट वेग अन 'साहेबाची शिट्टी'
थांबल्यावर चौकात एखाद्या सिग्नलपाशी 
खरंच तुम्हाला आठवत नाही काही ?

घेताना चहा एखाद संध्याकाळी 
वर येताना वाफा कपातूनी 
तुम्हा आठवण करून देत नाही 
बिलावरून भांडण अन चहाची टपरी ?

खरंच तुम्हाला आठवण होत नाही 
की  आठवणींत 'रमणं' सहन होत नाही (?)
दुरावा नात्यातला जपतोय आम्ही 
कधीतरी आठवण तुम्हालादेखील व्हावी !!!

- धनंजय चौधरी 







[Published in "Art Gallery", Zankaar 2012,MESCOE Pune]

No comments:

Post a Comment