घरं दिसायला असतात
घरांसारखी
पण असतात
माणसांच्या तऱ्हांसारखी
काही घरांना असतात
माणसांचे चेहरे
तर काही असतात
खोटे तर काही खरे
काही घरांना असतात
संस्कार रेषांचे उंबरठे
तर काहींना आपलेपणाचे
खोटे मुखवटे
काही घरं असतात
दाटीवाटीची
काही मोकळी
तर काही आतल्या गाठीची
काही घरं
कौलारू चंद्रमौळी
तर काहींच्या छपरांना
चांदण्यांची जाळी
काहींची सताड
उघडी कवाडे
तर काही घरांना
लोखंडी दारे
काही घरात खेळणारे
मुक्त वारे
तर काहींच्या
वर सक्तीचे पहारे
काही घरांना
असतात कान
तर काहींच्या मनावर
नको नको ते ताण
काही घरांची दारे
असतात बंद तर
काहींना असतात
भलते सलते छंद
काही घरं चक्क
असतात फुटपाथवर
तर काहींची आभाळे मात्र
असतात फार दूरवर
घरांचे घरपण नसते
फक्त शेकडो माळ्यांमुळे
तर घराला घरपण येते
त्यातल्या मायेच्या माणसांमुळे
कवयित्री - कावेरी डफळ
No comments:
Post a Comment