आड रानाच्या त्या माळावरती,
एकुलते एक ते झाड होते,
वाऱ्यासवे डुलत होते,
हिरवळीसंगे बोलत होते
फांदो फांदी बहरत होते,
पानो पानी सळसळत होते,
डौलदार ते सुंदर तरू,
दिमाखात डोलत होते
ऋतू सारे बदलत गेले,
तसे झाड मोहरू लागले,
फुला फळांनी झाड आता,
आनंदाने झुलू लागले
दिवसामागून दिवस सरले,
उदासीचे मेघ दाटून आले,
डोळ्यातून अश्रू झरावे तसे,
पानंपान गळू लागले
शांत झाला वाराही,
अदृश्य झाली हिरवळही,
उजाड माळरानावर आता,
विद्रूप दिसू लागले झाडही
दुःखाच्या हिंदोळ्यावर बसले तरी,
ताठ मानेने ते उभे होते,
रवितेजाची आग सोसत ,
सुकाळाची वाट ते पाहत होते
ठाऊक होते त्यालाही,
काळ असाच थांबत नाही,
दुःख सोसल्यावर मात्र,
सुख आल्याशिवाय राहत नाही
कवयित्री - कावेरी डफळ