Monday 20 July 2020

आगगाडी व जमीन

नको ग! नको ग !!
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून

धावसी मजेत
वेगात वरून
आणिक खाली मी
चालले चुरून !

छातीत पाडसी
कितीक खिंडारे
कितीक ढाळसी
वरून निखारे !

नको ग !नको ग!!
आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू
बेभान होऊन !

ढगात धुराचा
फवारा सोडून
गर्जत गाडी ती
बोलली माजून -

दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड

पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन !धावेन !

चला रे चक्रानो ,
फिरत गरारा
गर्जत पुकारा
आपुला दरारा !

शीळ अन कर्कश
गर्वात फुंकून
पोटात जळते
इंधन घालून

शिरली घाटात
अफाट वेगात
मैलाचे अंतर
घोटात गिळीत !

उद्दाम गाडीचे
ऐकून वचन
क्रोधात इकडे
थरारे जमीन

"दुर्बळ भेकड !
त्वेषाने पुकारी
घुमले पहाड
घुमल्या कपारी!

हवेत पेटला
सूडाचा घुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा

उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश !

उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडली खालती!!

कविवर्य : कुसुमाग्रज (काव्यसंग्रह "विशाखा")




"आगगाडी व जमीन" हि कविता कुसुमाग्रज ह्यांच्या 'विशाखा' ह्या पुस्तकातून घेतली आहे. त्या पुस्तकाची लिंक सोबत देत आहे :


No comments:

Post a Comment