Friday, 30 April 2021

त्या बेभान क्षणी


त्या बेभान क्षणी
मन माझे हेलावले
पाहता उधाण लाटांचे
नयन माझे स्थिरावले

चित्कार ऐकता लाटांचा
धडधडू लागले काळीजही
वादळाला सोबत द्याया
कोसळू लागला वरुणराजही

नाव आता हेलकाऊन
दोन बाजू झुकू लागली
वल्हवून सारखे हातातून
काठीही खाली पडू लागली

https://dc.kavyasaanj.com/2021/04/tya-bebhan-kshani-by-kaveri.html
लहान माझी नाव होती
तिलाही आता तग धरवेना
किनारा जवळ असुनही
पैलतीरी जाता येईना

लाटांची एक धडक बसता
नावेला जलसमाधी  झाली
नाकातोंडात पाणी जाता
मृत्युशय्या दिसू लागली

धीर न खचता धैर्याने
मी पोहू लागले
त्या दर्याला मागे सोडून
किनारी जाऊ लागले

पोहचता किनारी माझ्या
जीवात जीव आला
जवळून भयानक वाटणारा
सागर मनाला मोहऊन गेला

https://dc.kavyasaanj.com/2021/04/tya-bebhan-kshani-by-kaveri.html

कवयित्री - कावेरी डफळ





Friday, 16 April 2021

एकुलते एक झाड

आड रानाच्या त्या माळावरती,
एकुलते एक ते झाड होते,
वाऱ्यासवे डुलत होते,
हिरवळीसंगे बोलत होते

फांदो फांदी बहरत होते,
पानो पानी सळसळत होते,
डौलदार ते सुंदर तरू,
दिमाखात डोलत होते

ऋतू सारे बदलत गेले,
तसे झाड मोहरू लागले,
फुला फळांनी झाड आता,
आनंदाने झुलू लागले

दिवसामागून दिवस सरले,
उदासीचे मेघ दाटून आले,
डोळ्यातून अश्रू झरावे तसे,
पानंपान गळू लागले

https://dc.kavyasaanj.com/2021/04/ekulte-ek-jhaad-by-kaveri.html
(Pic Credit: Mahesh Mule)

शांत झाला वाराही,
अदृश्य झाली हिरवळही, 
उजाड माळरानावर आता,
विद्रूप दिसू लागले झाडही

दुःखाच्या हिंदोळ्यावर बसले तरी,
ताठ मानेने ते उभे होते,
रवितेजाची आग सोसत ,
सुकाळाची वाट ते पाहत होते

ठाऊक होते त्यालाही,
काळ असाच थांबत नाही,
दुःख सोसल्यावर मात्र,
सुख आल्याशिवाय राहत नाही

https://dc.kavyasaanj.com/2021/04/ekulte-ek-jhaad-by-kaveri.html

कवयित्री - कावेरी डफळ





Wednesday, 14 April 2021

घराचे घरपण

घरं दिसायला असतात
घरांसारखी
पण असतात
माणसांच्या तऱ्हांसारखी

काही घरांना असतात
माणसांचे चेहरे 
तर काही असतात
खोटे तर काही खरे

काही घरांना असतात
संस्कार रेषांचे उंबरठे
तर काहींना आपलेपणाचे 
खोटे मुखवटे

काही घरं असतात 
दाटीवाटीची
काही मोकळी 
तर काही आतल्या गाठीची 

काही घरं
कौलारू चंद्रमौळी  
तर काहींच्या छपरांना
चांदण्यांची जाळी 

काहींची सताड 
उघडी कवाडे
तर काही घरांना 
लोखंडी दारे

काही घरात खेळणारे 
मुक्त वारे  
तर काहींच्या 
वर सक्तीचे पहारे 

काही घरांना
असतात कान 
तर काहींच्या मनावर 
नको नको ते ताण

काही घरांची दारे 
असतात बंद तर 
काहींना असतात 
भलते सलते छंद
 
काही घरं चक्क
असतात फुटपाथवर 
तर काहींची आभाळे मात्र 
असतात फार दूरवर
 
घरांचे घरपण नसते
फक्त शेकडो माळ्यांमुळे
तर घराला घरपण येते
त्यातल्या मायेच्या माणसांमुळे 

https://dc.kavyasaanj.com/2021/04/gharache-gharpan-kaveri-dafal.html

कवयित्री - कावेरी डफळ