Sunday 23 August 2020

मी एकटी असतांना

गोड वाटते मला

मी एकटी असतांना

माझ्या गोजिरवाण्या भाचुकलीला

जवळ घेतांना

फुलासारखा चेहरा तिचा

अलगद कुरवाळतांना

अन् तिला गोड परिदुनीयेत नेतांना

मी एकटी असतांना…

कधी छान वाटते मला

मी एकटी असतांना

सांझवेळचा देखणा रवि

तिरक्या मानेने एकटक पाहतांना

नभात भरलेल्या चित्रकाराच्या

मनोरम कलेला न्यहाळतांना

वार्यावरती सळसळणार्या

हिरव्यागार पात्यांना, दिलखेच

रान फुलांना डोळ्यात टिपतांना

मी एकटी असतांना…

भारीच वाटते मला

मी एकटी असतांना

पुस्तकातल्या लेखकांना

प्रेमळपणे ऐकतांना

कुरळ्या,कुरळ्या केसांत बोटं फिरवतांना

मऊमऊ जणू लाटाच त्या

त्यांना नकळत स्पर्श करून येतांना

मी एकटी असतांना…

कधी गंमत वाटते मला

मी एकटी असतांना

दर्पणात त्या

बोलके डोळे पाहतांना

साधेपणातले सौंदर्य बघून

अलगद जरासे लाजतांना

डोळ्यावरली केसांची बट

हळुवार कानामागे सारतांना

पण… मी एकटी असतांना!
https://dc.kavyasaanj.com/2020/08/mi-ekti-asatana-by-mangala-kadam.html

कवयित्री : मंगला कदम






No comments:

Post a Comment