Wednesday 22 April 2020

एकांत

तो माझ्या आयुष्यात येइल असं वाटलं देखील नव्हतं

कारण त्याच्याशिवाय सुद्धा माझं जग आनंदीच होतं

आता मात्र त्याच्याशिवाय माझं पानदेखील हलत नाही

या मुखवट्यांच्या जगामधे आता कुणाचीच गरज वाटत नाही!

तसा पुर्वी सुद्धा तो कधी-मधी भेटायचा

अन् त्याच्यासोबत असताना वेळ अगदी अलगद निघुन जायचा

छोट्या छोट्याशा भेटींमधुनही

तो खूप काही शिकवुन जायचा...

शिकवायचा तो कधी आनंदात जमीनीवर राहायला

तर कधी दु:खात आभाळाकडे बघायला

कधी रागात शांत राहायला

तर कधी उत्साहात गंभीर व्हायला

अजुनही शिकवतो तो हलकेच गाणी गुणगुणायला

तर कधी मनसोक्त नाचायला

कधी आरशात बघुन लाजायला

तर कधी स्वत:शीच हसायला...

शिकवलं त्याने मला मन 'मोठं' पण 'कणखर' करायला

त्यामुळे आता वाटत नाही कसलीच खंत

कोण आहे तो अवलीया?

हं... तो आहे एकांत...!

कवयित्री - सानिका काळे 




No comments:

Post a Comment