कधीतरी आठवण यावी
एवढे देखील उरलो नाही
की आठवण्यासाठी तुमच्या
आठवणींत मुरलो नाही
कधीतरी मैफिल जमावी
निदान नव्या जोडीदारांची
अन त्यात एखाद्या शब्दांनी
आमची आठवण यावी
रमून जावे शब्दा - शब्दांनी
जुन्या दिवसांत कधीतरी
का जुनी मैत्री 'जुनी झाली '
म्हणून पडताळात टाकले तुम्ही ?
कधी तरी - कुठे तरी
नाही तर एखाद्या नाक्यावरी
एखादा टोळका पाहुनी
थोडीसुद्धा आठवण येत नाही ?
एखाद्या सिनेमाची गाणी
आठवण करते सिनेमा पाहिल्याची
होतो सोबत सिनेमा पाहताना तरी
किमान एवढी तरी आठवण व्हावी
पाहताना जुने फोटो चुकून कधीतरी
सोबत पाहिलेली गड-किल्ला-लेणी
पावसातली सहल धबधब्याची
आठवत नाही का गमती - जमती ?
मोडलेला 'सिग्नल' आणि 'ट्रीप्सी'
भन्नाट वेग अन 'साहेबाची शिट्टी'
थांबल्यावर चौकात एखाद्या सिग्नलपाशी
खरंच तुम्हाला आठवत नाही काही ?
घेताना चहा एखाद संध्याकाळी
वर येताना वाफा कपातूनी
तुम्हा आठवण करून देत नाही
बिलावरून भांडण अन चहाची टपरी ?
खरंच तुम्हाला आठवण होत नाही
की आठवणींत 'रमणं' सहन होत नाही (?)
दुरावा नात्यातला जपतोय आम्ही
कधीतरी आठवण तुम्हालादेखील व्हावी !!!
- धनंजय चौधरी
[Published in "Art Gallery", Zankaar 2012,MESCOE Pune]