आपण दुसऱ्या विषयांवर बोलतो
तिसऱ्या चित्रांविषयी
चौथ्या कवितांविषयी
कितव्या तरी पुस्तकाच्या
प्रस्तावनेविषयी
बोलतो
हसतो बोलताना आपापल्या जागेहून
फोन धरलेल्या हाताची बोटं उत्सुक
दुसऱ्या हाताच्या बोटांमधल्या रिकाम्या जागा
गुंफून भरून काढण्यासाठी
पायांना धावत सुटावं वाटतंय तुझ्याकडे
भेटूया कधीतरी… असं नेहमीचं म्हणून
आपण फोन ठेवतो
उठून कामाला लागण्याआधी
बोलायचे होते जे ते शब्द भवताली जमलेले
तरंगताहेत हिरमुसून अधांतर
गोळा करून ठेवेन
आपण न उच्चारलेल्या शब्दांची रास
अशी किती काळ वाढतच राहणारेय?
निदान आतातरी पाहा एकदा मान वळवून
पहिल्या शब्दाकडे
मग ठेव माझ्या तळहातावर
निखाऱ्याचं फूल.
कवयित्री : कविता महाजन
No comments:
Post a Comment