पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी
शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी.
बघ नांगरलं नांगरलं, कुळवून वज केली,
सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली...
तापली धरणी, पोळले चरणी मी अनवाणी,
पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी
निढळावर हात ठेवून वाट मी किती पाहू?
खिंडीतोंडी हटवाद्या नको उभा राहू!!
वरड वरड वरडिती, रानी मोरमोरिनीं
पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी
पाण्या पड तू, मिरगाआधी रोहिणीचा,
पाळणा रे लागे भावाआधी बहिनिचा!!
आला वळीव खिंडीतोंडी शिवार झोडीत
जाईच्या ग झाडाखाली धनी पाभर सोडित.
पड रे पाण्या, पड रे पाण्या, भिजवि जमिनी
जेवण घेऊन शेतावरी चालली कामिनी!!!
कवी: र. वा. दिघे
(गायक: प्रल्हाद शिंदे)

No comments:
Post a Comment