स्वप्नामध्ये आली होती एक चिऊताई
चिवचिव चिवचिव बोलत होती काही !!धृ!!
कधी इथे कधी तिथे फिरवुनी मान
धावू धावू बघे घरामधले सामान
उडता उडता खिडकीमध्ये दमुनिया बसे
इवल्या इवल्या डोळ्यामध्ये पाणी इवलेसे
पुसू जाता तिला म्हणे काही झाले नाही
काय तिला हवे होते कळलेच नाही !१!
चिऊ बोले मला माझ्या चिमुकल्या फुला
पिण्यासाठी पाणी नाही मिळाले रे मला
म्हणे बाळा काम माझे ऐकशील काय?
अंगणात दाणापाणी ठेवशील काय?
उन्हाने या होते आहे माझी लाहीलाही
उन्हाळा गेला की काही मागणार नाही !२!
प्रेमाने मी काम तिचे ऐकणार आहे
अंगणात चारापाणी ठेवणार आहे
तुम्हीसुद्धा अंगणात ठेवा उद्या काही
नाहीतर चिमणी उरणार नाही
नाहीतर चिमणी उरणार नाही !३!
कवी - शांताराम खामकर
(गायक - श्री जाधव! संगीत- तानाजी जाधव)
No comments:
Post a Comment