Sunday, 23 May 2021

प्रेम आणि मरण


कुठल्याशा जागी देख ।
मैदान मोकळे एक ॥ पसरलें ॥
वृक्ष थोर एकच त्यांत ।
वाढला पुर्या जोमांत ॥ सारखा ॥
चहुंकडेच त्याच्या भंवतें ।
गुडघाभर सारें जग तें ॥ तेथलें ॥
झुडुपेंच खुरट इवलालीं ।
मातींत पसरल्या वेली ॥ माजती ॥
रोज ती । कैक उपजती । आणखी मरती ।
नाहि त्या गणती । दादही अशांची नव्हती ॥ त्याप्रती ॥

त्यासाठी मैदानांत ।
किति वेली तळमळतात ॥ सारख्या ॥
परि कर्माचे विंदान
कांही तरि असतें आन ॥ चहुंकडे ॥
कोणत्या मुहूर्तावरतीं ।
मेघांत वीज लखलखती ॥ नाचली ॥
त्या क्षणी । त्याचिया मनीं । तरंगति झणीं।
गोड तरि जहरी । प्रीतीच्या नवथर लहरी ॥ न कळतां ॥

तो ठसा मनावर ठसला ।
तो घाव जिव्हारीं बसला ॥ प्रीतिचा ॥
वेड पुरें लावी त्याला ।
गगनांतिल चंचल बाला ॥ त्यावरी ॥
जतिधर्म त्याचा सुटला ।
संबंध जगाशी तुटला ॥ त्यापुढें ॥
आशाहि । कोठली कांहि । राहिली नाहिं ।
सारखा जाळी । ध्यास त्यास तीन्ही काळीं ॥ एक तो ॥

मुसळधार पाउस पडला ।
तरि कधी टवटवी त्याला ॥ येइना ॥
जरि वारा करि थैमान ।
तरि हले न याचें पान ॥ एकही ॥
कैकदा कळयाही आल्या ।
नच फुलल्या कांही केल्या ॥ परि कधी ॥
तो योग । खरा हठयोग । प्रीतिचा रोग ।
लागला ज्याला । लागतें जगावें त्याला ॥ हें असें ! ॥

ही त्याची स्थिती पाहुनिया ।
ती दीड वीतीची दुनिया ॥ बडबडे ॥
कुणी हंसे कुणी करि कींव।
तडफडे कुणाचा जीव ॥ त्यास्तव ॥
कुणि दयाहि त्यावरि करिती ।
स्वर्गस्थ देव मनिं हंसती ॥ त्याप्रती ॥
निंदिनी । कुणी त्याप्रती ॥ नजर चुकविती ।
भीतिही कोणी । जड जगास अवजड गोणी ॥ होइ तो ॥

इष्काचा जहरी प्याला ।
नशिबाला ज्याच्या आला ॥ हा असा ॥
टोंकाविण चालू मरणें ।
तें त्याचें होतें जगणें ॥ सारखें ॥
हृदयाला फसवुनि हंसणें ।
जीवाला न कळत जगणें ॥ वरिवरी ॥
पटत ना । जगीं जगपणा । त्याचिया मना ॥
भाव त्या टाकी । देवांतुनि दगडचि बाकी ॥ राहतो ॥

यापरी तपश्चर्या ती ।
किति झाली न तिला गणती ॥ राहिली ॥
इंद्राच्या इंद्रपदाला ।
थरकांप सारखा सुटला ॥ भीतिनें ॥
आश्चर्ये ऋषिगण दाटे ।
ध्रुवबाळा मत्सर वाटे ॥ पाहुनी ॥
तों स्वतां । तपोदेवता । काल संपतां ।
प्रकटली अंती । ''वरं ब्रूहि'' झाली वदती ॥ त्याप्रती ॥

''तप फळास आलें पाही ।
माग जें मनोगत कांही ॥ यावरी ॥
हो चिरंजीव लवलाही ।
कल्पवृक्ष दुसरा होई ॥ नंदनी ॥
प्रळयींच्या वटवृक्षाचें ।
तुज मिळेल पद भाग्याचें ॥ तरुवसा ॥''
तो वदे '' देवि सर्व-दे । हेंच एक दे -
भेटवी मजला । जीविंच्या जिवाची बाला ॥ एकदा ॥''

सांगती हिताच्या गोष्टी ।
देवांच्या तेतिस कोटी ॥ मग तया ॥
'' ही भलती आशा बा रे ॥
सोडि तूं वेड हें सारें ॥ घातकी ॥
स्पर्शासह मरणहि आणी ।
ती तुझ्या जिवाची राणी ॥ त्या क्षणी ॥
ही अशी शुध्द राक्षसी । काय मागसी ।
माग तूं कांही । लाभलें कुणाला नाहीं ॥ जें कधी ॥''

तो हंसे जरा उपहासें ।
मग सर्वेच बदला खासें । त्यांप्रती ॥
'' निष्प्रेम चिरंजीवन तें।
जगिं दगडालाहि मिळतें ॥ धिक तया ॥
क्षण एक पुरे प्रेमाचा ।
वर्षाव पडो मरणांचा । मग पुढें ॥''
निग्रहे । वदुनि शब्द हे । अधिक आग्रहें ।
जीव आवरुनी । ध्यानस्थ बैसला फिरुनी ॥ वृक्ष तो ॥

तो निग्रह पाहुनि त्याचा ॥
निरुपाय सर्व देवांचा ॥ जाहला ॥
मग त्याला भेटायाला ।
गगनांतील चंचल बाला ॥ धाडिली ॥
धांवली उताविळ होत ।
प्रीतीची जळती ज्योत ॥ त्याकडे ॥
कडकडे । त्यावरी पडे स्पर्श जों घडे ।
वृक्ष उन्मळला । दुभंगून खाली पडला ॥ त्या क्षणीं ॥

दुभंगून खालीं पडला ।
परि पडतां पडतां हंसला ॥एकदा ॥
हर्षाच्या येउनि लहरी ।
फडफडुनी पानें सारी ॥ हांसली ॥
त्या कळया सर्वही फुलल्या ॥
खुलल्या त्या कायम खुलल्या ॥ अजुनिही ॥
तो योग । खरा हठयोग । प्रीतीचा रोग ।
लागला ज्याला । लाभतें मरणही त्याला ॥ हें असें ॥

https://dc.kavyasaanj.com/2021/05/prem-ani-maran-govindagraj.html

कवी - गोविंदाग्रज 





Wednesday, 19 May 2021

त्रिधा राधा

आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
स्वच्छन्द,*(संसिद्ध)
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा

https://dc.kavyasaanj.com/

कवी - पु. शि. रेगे (पुरुषोत्तम शिवराम रेगे)


* - ‘गंधरेखा’ या संग्रहात ही कविता पुन्हा घेताना कवी रेगे यांनी ‘स्वच्छन्द’च्या जागी ‘संसिद्ध’ हा शब्द घातला आहे.





Monday, 17 May 2021

विझलो आज जरी मी

विझलो आज जरी मी,

हा माझा अंत नाही…..

पेटेन उद्या नव्याने,

हे सामर्थ्य नाशवंत नाही ||

छाटले जरी पंख माझे,

पुन्हा उडेल मी.

अडवू शकेल मला,

अशी अजून भिंत नाही…

माझी झोपडी जाळण्याचे,

केलेत कैक कावे….

जळेल झोपडी अशी,

आग ती ज्वलंत नाही….

रोखण्यास आग माझी,

वादळे होती अतुर..

डोळ्यात जरी गेली धूळ,

थांबण्यास उसंत नाही…

येतील वादळे,खेटेल तुफान,

तरी वाट चालतो….

अडथळ्यांना भिऊन अडखळने,

पावलांना पसंत नाही….

https://dc.kavyasaanj.com/2021/05/vijhalo-aaj-jari-mi-suresh-bhat.html

कवी - सुरेश भट 





Tuesday, 4 May 2021

सांग देवा पुन्हा कशी सुरुवात करू

कसा आणि कुठे कुठे
आता मी पुरा पडू             
सांग देवा पुन्हा कशी 
सुरुवात करू

सम्राज्य हे माझे सारे
एका क्षणात उध्वस्त झाले
शून्यातून उभारलेले सारे
पुन्हा शून्यातच मिळाले.
सांग देवा पुन्हा कशी सुरुवात करू...

सुखात मागे पुढे फिरणारे
आता मला दिसेनासे झाले.
पैसा गेल्यावर माझेच 
सगे मला सोडून गेले
सांग देवा पुन्हा कशी सुरुवात करू...

संपत्ती असताना माणसांची
सगळी वर्दळ असते
माणसांची सच्ची नियत फक्त
खरी वेळ आल्यावरच कळते
सांग देवा पुन्हा कशी सुरुवात करू...

निंदकांचीच आता 
सगळी गर्दी आहे
उपाय सूचन वेगळच पण 
चिंतेचीच सदा वर्दी आहे.
सांग देवा पुन्हा कशी सुरुवात करू...

आज मला समजले नुसता पैसा
 गोळा करून काही होता नाही
पडत्या काळात आपल्या 
पाठीशी खंबीरपणे उभी राहतील
अशी माणसे जोडता आली पाहिजे...

https://dc.kavyasaanj.com/2021/05/saang-deva-by-kaveri.html

कवयित्री - कावेरी डफळ