Friday, 3 January 2020

प्रेमाचा गुलकंद

बागेतुनी व बाजारातुनी कुठुनी तरी ‘त्याने’
गुलाबपुष्पे आणून द्यावीत ‘तिज’ला नियमाने
कशास सांगू  प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!
गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलबी त्या
लाल अक्षरे जणू लिहलेल्या पाठोपाठ नुसत्या
प्रेमदेवता प्रसन्न हो! या नैवद्याने
प्रेमाचे हे मार्ग गुलबी जाणती नवतरणे
कधी न त्याचा ती अवमानी फ़ुलता नजरणा
परी न सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा
या मौनातच त्यास वाटले अर्थ असावे खोल
तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल
अखेर थकला ढळली त्याची प्रेमतपश्चर्या
रंग दिसे ना खुलावयाचा तिची शान्त चर्या
धडा मनाचा करुन शेवटी म्हणे तिला ‘देवी’
दुजी आणखी विशेषणे तो गोन्डस तिज तो लावी
“बांधीत आलो पुजा तुज मी आजवरी रोज
तरी न उमगशी अजुन कसे तू भक्ताचे काज
गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग सुन्दरी फ़ुकट का सगळे गेले?”
तोच ओरडून त्यास म्हणे ती “आळ वृथा  हा की
एक पाकळी ही न दवडली तुम्ही दिल्यापैकी”
हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउन ये बाहेरी कसलीशी बरणी
म्हणे “पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद
आणि बनवला तुमच्यासाठी इतुका गुलकंद
का डोळे असे फ़िरवता का आली भोवंड
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड ”
क्षणैक दिसले तारांगण त्या परी शांत झाला
तसाच बरणी आणि घेवुनी खान्द्यावरी आला
“प्रेमापायी भरला” बोले “भुर्दन्ड न थोडा
प्रेमलाभ नच, गुलकंद तरी कशास हा दवडा?”
याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला
‘हृदय थांबूनी कधीच ना तरी असता तो’ खपला!
तोंड आबंले असेल ज्यांचे प्रेम निराशेने
प्रेमाचा गुलकंद तयानी चाखूनी हा बघणे..

https://dc.kavyasaanj.com/2020/01/Premacha-gulkand.html
कवी - आचार्य प्र. के. अत्रे  (‘झेंडूचीं फुलें’)




"प्रेमाचा गुलकंद" हि कविता आचार्य प्र. के. अत्रे ह्यांच्या ‘झेंडूचीं फुलें’ ह्या पुस्तकातून घेतली आहे. त्या पुस्तकाची लिंक सोबत देत आहे :



No comments:

Post a Comment