Saturday 27 December 2014

कधीतरी आठवण यावी

कधीतरी आठवण यावी
एवढे देखील उरलो नाही 
की  आठवण्यासाठी तुमच्या 
आठवणींत मुरलो नाही 

कधीतरी मैफिल जमावी 
निदान नव्या जोडीदारांची 
अन त्यात एखाद्या शब्दांनी 
आमची आठवण यावी 

रमून जावे शब्दा - शब्दांनी 
जुन्या दिवसांत कधीतरी 
का जुनी मैत्री 'जुनी झाली '
म्हणून पडताळात टाकले तुम्ही ?

कधी तरी -  कुठे तरी 
नाही तर एखाद्या नाक्यावरी 
एखादा टोळका पाहुनी 
थोडीसुद्धा आठवण येत नाही ?

एखाद्या सिनेमाची गाणी 
आठवण करते सिनेमा पाहिल्याची 
होतो सोबत सिनेमा पाहताना तरी 
किमान एवढी तरी आठवण व्हावी 

पाहताना जुने फोटो चुकून कधीतरी 
सोबत पाहिलेली गड-किल्ला-लेणी 
पावसातली सहल धबधब्याची 
आठवत नाही का गमती - जमती ?

मोडलेला 'सिग्नल' आणि 'ट्रीप्सी'
भन्नाट वेग अन 'साहेबाची शिट्टी'
थांबल्यावर चौकात एखाद्या सिग्नलपाशी 
खरंच तुम्हाला आठवत नाही काही ?

घेताना चहा एखाद संध्याकाळी 
वर येताना वाफा कपातूनी 
तुम्हा आठवण करून देत नाही 
बिलावरून भांडण अन चहाची टपरी ?

खरंच तुम्हाला आठवण होत नाही 
की  आठवणींत 'रमणं' सहन होत नाही (?)
दुरावा नात्यातला जपतोय आम्ही 
कधीतरी आठवण तुम्हालादेखील व्हावी !!!

- धनंजय चौधरी 







[Published in "Art Gallery", Zankaar 2012,MESCOE Pune]

Sunday 14 December 2014

लावणण्याची खणी

मनाला पासपोर्ट-तिकीट
काहीच लागत नाही
क्षणात जातो - क्षणात येतो
तिच्या जवळ जावोनी

एकदा जावोनी परतले
मन निरोप घेवोनी
म्हणे - सांगतो आज
गुपित तिचे गोडवानी
काव्यसंपदा : लावण्याची खणी

सजली होती अशी
जशी सौंदर्याची राणी
डोळ्यात चमकत होते
गार निळेशार पाणी

भाळी मांडले होते
असे कुंकू लाल
लाल लालच होते
तिचे मऊ-मऊ गाल

आखीव-रेखीव नाक असे
त्यात सुंदर रिंग डोलत असे
अजूनही पाहिले नव्हते
'लावणण्याची खणी' कुठे

आरश्याची 'नजर'
बहुदा लागली असती
म्हणूनच  का तिने
काजळ भरले नयनी

सौंदर्याला उपमा 'ती'
नाही दुसरी जगजेठी
प्रीतीची सुंदर पंक्ती
नाही जुळली आजवरी !!!

-धनंजय चौधरी 





Sunday 7 December 2014

ऋणानुबंध

ती म्हणते मला
'तू खूप बदललाय'
मग तीही कुठे 
पूर्वीसारखी राहिलीय 

गोड गोड आठवणी आम्ही 
सोबतच रचलेल्या होत्या 
मग फक्त भांडणं अन कटुता 
का राहावी स्मृतीगंधात तिच्या 

ती  म्हणते-'पूर्वी तू असा नव्हता' 
पण मी आहे तसाच 
फक्त तिच्या पाहण्याचा 
दृष्टीकोन बदललाय 

करीअरच्या नावाखाली 
वेळेचा समतोल बिघडलाय 
मेसेज, chat आणि call 
सगळच आता हरवलय 

ती म्हणते-' हल्ली तू 
खूप बारीक झालाय'
अगSS! विचारांती विचार माझे 
मनाला माझ्या खात असतात 

सगळ्यांचाच विचार करायचाय 
तुझा - माझा अन आपला 
विचार मनाला पोखरतोय 
समाजशील प्राणी असल्याचा 

ती म्हणते - भेटू का
 कधी आपण पुन्हा 
अगSS! प्रेम हि भावना आहे 
नसे कोणता गुन्हा 

साथ-सोबत , प्रीत-गंध 
साथ असे नील अंबर 
साथ जसे ऋणानुबंध 
साथ आपले ऋणानुबंध !!!

-धनंजय चौधरी