तर या क्षणी
कागदांच्या लगद्यापासून बनवलेल्या
पक्ष्यांची एक माळ आहे
वाऱ्यावर ती किंचित हलतेय
जागच्या जागी
कागदांवर लिहिली असतील कुणी
प्रेमपत्रं अज्ञात भाषालिपीत
लिहिल्या असतील कविता
किंवा हिशेब
किंवा सजा सुळावर चढवण्याची
… सारं पोटात घेऊन
झुलताहेत हलकेच रंगीत पक्षी
पक्षी पिंजऱ्यात नाहीत
की त्यांची मुक्तता करता यावी
पक्षी स्मरणात नाहीत
की त्यांना विस्मरणात धाडता यावं
पक्षी कागदाच्या लगद्यात आहेत
झाडाचा कागद कागदाचे पक्षी
हा न्यायच असेल कदाचित
मला मधल्यामध्ये
अपराधी वाटतंय उगा
- कविता महाजन