शेतामधी माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो
माझा शेतकरी बाप
लेतो अंगावर चिंध्या
खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट
जगा मिळाया साखर
काटा त्याच्याच का पाई
त्यानं काय केलं पाप?
माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रातदिस कामधंदा
कष्ट सारी त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप
बाप फोडीतो लाकड
माय पेटविते चुल्हा
पिठामागल्या घामाची
काय सांगू तुला
आम्ही कष्टाचंच खातो
जग करीहा हापाहाप!
कवी – इंद्रजीत भालेराव