Thursday, 27 February 2020

नाच रे मोरा


नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच !

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी,
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच ll

झर झर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ,
काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच ll

थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत,
खेळ खेळू दोघांत
निळया सौंगड्या नाच ll

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान
सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच ll

कवी — ग.दि.माडगूळकर




Wednesday, 12 February 2020

लाला टांगेवाला

लाल टांगा घेऊन आला, लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

कुडता लालेलाल त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

टांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलाल
चाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाल
लालेलाल चाबूक उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला
"चल रे लाला, नेरे मला, माझ्या गावाला"
लीला बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

झाडे लालेलाल त्यांची फुले लालेलाल
रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल
लालेलाल धुरळा उडवित गेला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

कवी - ना. गो. शुक्ल




Monday, 10 February 2020

दोस्त आपुला पाऊस आला

दोस्त आपुला पाऊस आला,
उघडा खिडक्या, दारे
थेंब होऊनी मुठीत आले,
आभाळातील तारे
हिरव्या, हिरव्या फांद्यांवरती,
थेंबांचे झोपाळे झुलती
उंच ढगांना पाय लावण्या,
झोके घेती वारे...
https://dc.kavyasaanj.com/2020/02/dost-apula-pavus-mangesh-padgaonkar.html

कवी - मंगेश पाडगावकर





Saturday, 8 February 2020

धुंद एकांत हा

धुंद एकांत हा, प्रीत आकारली
सहज मी छेडिता तार झंकारली

जाण नाही मला प्रीत आकारली
सहज तू छेडिता तार झंकारली

गंधवेडी कुणी, लाजरी, बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेलीवरी
यौवनाने तिला आज शृंगारली

गोड संवेदना अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे
लोचनी चिंतनी मूर्त साकारली

रोमरोमांतुनी गीत मी गाइले
दाट होता धुके स्वप्‍न मी पाहिले
पाहता पाहता रात्र अंधारली

आज बाहुत या, लाज आधारली
सहज तू छेडिता, तार झंकारली

कवी - जगदीश खेबूडकर




Tuesday, 4 February 2020

एकांत

एक बाकी एकाकी
एक अंत एकांत
एक अड़के एकात
एक एकटया जगात
एक खिड़की एक तारा
एक चाहुल एक वारा
एक नजर एक वाट
एक एकटा एकटाच

कवी - वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)




Sunday, 2 February 2020

या लाडक्या मुलांनो

या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार
नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार

आईस देव माना, वंदा गुरूजनांना
जगि भावनेहुनी त्या कर्तव्य थोर जाणा
गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार

शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे
टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पुजावे
जे चांगले जगी या त्यांचा करा स्वीकार

शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा
हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा
कुलशील छान राखा ठेवू नका विकार

कवी - मधुकर जोशी