Tuesday, 14 January 2020

तू फुलराणी

तू फुलराणी, तू मेनका
सौंदर्यवती मधुचंद्रा
रूपवती, माधुर्यवती ललना
अन प्रसन्न तुझी मुद्रा

सुखाची वर्षा, मोहोर प्रीतीची
अशी मनाला साद घालिती
गुलाबी गाल, लाल ओठ
फिके पाचू अन माणिक मोती

तुझ्यासम कोण नसे
ह्या पृथ्वीतलावर
विराजमान तू शोभतसे
अप्सरांच्यात दैवलोकावर

चंद्राची चांदणी
रुपनगरची राणी
करुणारुपी ऐशी
माझी मन मोहिनी

पाणीदार डोळे तुझे
काय तुला सांगू
चंद्राने घेतली शीतलता
उधार तुझ्याकडून

कसा गर्व करतो
उच्च पदस्थ असल्याचा
तुझ्या कंठाचा तो
हार माणिक मोत्यांचा

कानातल्या झुमक्यांना
वाटत असे शोभा
उंच नभी झुलण्याचा
आनंद भासतसे त्याला

नाकातल्या नथणीला
वाटतो तुझा हेवा
तिला वाटे माझा खडा
तुझ्या ओठांसारखा हवा

ओठांत तुझ्या मदिरा
नजरेत आहे नशा
झिंगतो मी पाहताच
मादक अशी अदा

करीतसे बेभान मला
तुझ्यात आहे अशी जादू
भाव मनातील अन रक्त धमन्यातील
होत असे बेकाबू

सुवर्ण तुझा रंग
दरवळतो गंध
पाहताना होतो दंग
घट्ट आवळलेला बाजूबंद

शब्दांची धावपळ
भावनांची वर्दळ
नजरेचा कटाक्ष
होते जीवाची तळमळ
होते माझ्या जीवाची तळमळ!!

 - धनंजय चौधरी




Monday, 13 January 2020

छोटेसे बहीण भाऊ

छोटेसे बहिण-भाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला
नवीन आकार देऊ

ओसाड उजाड जागा,
होतील सुंदर बागा
शेतांना मळ्यांना, फुलांना फळांना
नवीन बहार देऊ

मोकळ्या आभाळीं जाऊ,
मोकळ्या गळ्याने गाऊ
निर्मळ मनाने, आनंदभराने
आनंद देऊ अन घेऊ

प्रेमाने एकत्र राहू,
नवीन जीवन पाहू,
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे
अनेक एकत्र होऊ

https://dc.kavyasaanj.com/2020/01/Chotese-bahin-bhavu-vasant-bapat.html
कवी — वसंत बापट





Thursday, 9 January 2020

जेव्हा तिला वाटत असतं...

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

कवी -- मंगेश पाडगावकर




Sunday, 5 January 2020

कुछ हँस के..

कुछ हँस के
बोल दिया करो,

कुछ हँस के
टाल दिया करो,

यूँ तो बहुत
परेशानियां है

तुमको भी
मुझको भी,

मगर कुछ फैंसले
वक्त पे डाल दिया करो,

न जाने कल कोई
हंसाने वाला मिले न मिले..

इसलिये आज ही
हसरत निकाल लिया करो !!

समझौता
करना सीखिए..

क्योंकि थोड़ा सा
झुक जाना

किसी रिश्ते को
हमेशा के लिए

तोड़ देने से
बहुत बेहतर है ।।।

किसी के साथ
हँसते-हँसते

उतने ही हक से
रूठना भी आना चाहिए !

अपनो की आँख का
पानी धीरे से

पोंछना आना चाहिए !
रिश्तेदारी और

दोस्ती में
कैसा मान अपमान ?

बस अपनों के
दिल मे रहना
आना चाहिए...!

- गुलज़ार





Saturday, 4 January 2020

अठ्ठावीस युगांचं एकटेपण

देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रख्माय शेजारी
नुस्ती वीट



मी म्हणालो ऱ्हायलं
रख्माय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं


पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून



आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही



रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला



मी परत पाह्यलं
खात्री करून घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं



दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं जरा
होत नाही



कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही



खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले



आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही



आज एकदमच मला
भेटायला धावून आलं

अठ्ठावीस युगांचं एकटेपण

कवी - अरुण कोलटकर (‘चिरीमिरी’, प्रास प्रकाशन)https://dc.kavyasaanj.com/2020/01/athavis-yug-kolhatkar-kavita.html





"अठ्ठावीस युगांचं एकटेपण" हि कविता अरुण कोलटकर ह्यांच्या ‘चिरीमिरी’ ह्या पुस्तकातून घेतली आहे. त्या पुस्तकाची लिंक सोबत देत आहे :



Friday, 3 January 2020

प्रेमाचा गुलकंद

बागेतुनी व बाजारातुनी कुठुनी तरी ‘त्याने’
गुलाबपुष्पे आणून द्यावीत ‘तिज’ला नियमाने
कशास सांगू  प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!
गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलबी त्या
लाल अक्षरे जणू लिहलेल्या पाठोपाठ नुसत्या
प्रेमदेवता प्रसन्न हो! या नैवद्याने
प्रेमाचे हे मार्ग गुलबी जाणती नवतरणे
कधी न त्याचा ती अवमानी फ़ुलता नजरणा
परी न सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा
या मौनातच त्यास वाटले अर्थ असावे खोल
तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल
अखेर थकला ढळली त्याची प्रेमतपश्चर्या
रंग दिसे ना खुलावयाचा तिची शान्त चर्या
धडा मनाचा करुन शेवटी म्हणे तिला ‘देवी’
दुजी आणखी विशेषणे तो गोन्डस तिज तो लावी
“बांधीत आलो पुजा तुज मी आजवरी रोज
तरी न उमगशी अजुन कसे तू भक्ताचे काज
गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग सुन्दरी फ़ुकट का सगळे गेले?”
तोच ओरडून त्यास म्हणे ती “आळ वृथा  हा की
एक पाकळी ही न दवडली तुम्ही दिल्यापैकी”
हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउन ये बाहेरी कसलीशी बरणी
म्हणे “पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद
आणि बनवला तुमच्यासाठी इतुका गुलकंद
का डोळे असे फ़िरवता का आली भोवंड
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड ”
क्षणैक दिसले तारांगण त्या परी शांत झाला
तसाच बरणी आणि घेवुनी खान्द्यावरी आला
“प्रेमापायी भरला” बोले “भुर्दन्ड न थोडा
प्रेमलाभ नच, गुलकंद तरी कशास हा दवडा?”
याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला
‘हृदय थांबूनी कधीच ना तरी असता तो’ खपला!
तोंड आबंले असेल ज्यांचे प्रेम निराशेने
प्रेमाचा गुलकंद तयानी चाखूनी हा बघणे..

https://dc.kavyasaanj.com/2020/01/Premacha-gulkand.html
कवी - आचार्य प्र. के. अत्रे  (‘झेंडूचीं फुलें’)




"प्रेमाचा गुलकंद" हि कविता आचार्य प्र. के. अत्रे ह्यांच्या ‘झेंडूचीं फुलें’ ह्या पुस्तकातून घेतली आहे. त्या पुस्तकाची लिंक सोबत देत आहे :