Tuesday, 6 February 2018

सारेच दीप कसे मंदावले आता

सारेच दीप कसे मंदावले आता
ज्योती विझू विझू झाल्या
की झड घालून प्राण द्यावा पतंगाने
असे कुठेच तेज नाही !
थिजले कसे आवाज सारे?
खडबडून करील पडसाद जागे 
अशी कुणाची साद नाही?
या रे या ! द्या जीव या बाणीवर
अशी वाणी निघत नाही
 भावनाना चेव नाही
यौवना आव्हान नाही
संघर्ष नाही झुंज नाही
जावे ज्या मागे बेधड़क
असा झुंजार वीर नाही
कामी यावा देह जिथे
असा रणसंग्राम नाही !
प्रेतेही उठतील अशा
मंत्राचा उदघोष नाही !
आशांचा हिरमोड
आणि बंडांचा बिमोड
सारीकडे तडजोड
होऊन, सारे कसे सर्दावले आता?
सारेच कसे थंडावले आता !
साऱ्याच आघाड्यावरी ही अशी हो सामसुम !
वरतीखाली सामसूम
इकडेतिकडे सामसूम
आजूबाजूस सामसूम
जनमनांतहि सामसूम
हृदयातहि सामसूम
कुठे पोटतिडिक नाही
प्रेमामधेही धडक नाही
जीव ओढून घेईल अशी
डोळ्यामध्ये फडक नाही
तारुण्याची चमक नाही,धमक नाही
साहित्यात चैतन्य नाही
संगीतात इंगित आणि कलेमध्ये उकल नाही
सरळपणाला भाव नाही
साधा सदाचार नाही
जो तो कसा लाचार आहे
ह्याची त्याला फूस आहे
घराघरात घूस आहे !
तेरी चुप मेरी चुप 
गुपचुप
सारा हिशेबी व्यवहार आहे !
जो तो जागा धरून आहे
नाही तर अडवून आहे
दबेल असून चढेल आहे
योजनांची चळत आहे
परकियांची मदत आहे
तज्ञाचीहि उणीव नाही
आपली जाणीव नाही !
त्याग त्यागिले भोग मागे
दाता दिनयाचना मागे
शील आपले मोल मागे
सौंदर्याची विक्री चाले
कागदांच्या कपटयांवर !
सारीं स्वरूपें कुरूप झाली
हुरूप कशाचा नाही चित्ता !
सारेच दीप कसे मंदावले आता !!

https://dc.kavyasaanj.com/2018/02/sarech-deep-kase-mandavale-by-kavi-anil.html

कवी - अनिल (आत्माराम रावजी देशपांडे)
(काव्यसंग्रह: "कविता शतकाची", शब्द प्रकाशन)