Thursday, 27 February 2025

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरूलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरांत राहते मराठी
https://dc.kavyasaanj.com/2025/02/marathi-bhasha-din-poem-labhale-aamhas-bhagya-bolto-marathi-by-suresh-bhat.html
https://dc.kavyasaanj.com/2025/02/marathi-bhasha-din-poem-labhale-aamhas-bhagya-bolto-marathi-by-suresh-bhat.html

गीतकार - सुरेश भट




Friday, 17 January 2025

मिंकी आणि जादुई आंब्याचे झाड

एकदा काय झाले, गोदावरी नदीच्या काठी असलेल्या दाट जंगलात एक मोठ्ठं जादुई आंब्याचे झाड होतं. त्या झाडाला अतिशय गोड आणि रसाळ आंबे लागत असत. झाडाची एकच अट होती: "एकावेळी फक्त एक आंबा तोडा. लालची लोकांना काहीच मिळणार नाही!"

त्या जंगलात मिंकी नावाचा खट्याळ माकड राहत होता. एके दिवशी त्याला झाड दिसलं. मिंकीला खूप भूक लागली होती, पण त्याचा खोडकरपणा काही केल्या कमी होत नव्हता. "एक आंबा कशाला? मी खूप आंबे तोडतो!" असं त्याने ठरवलं.

रात्री झाड शांत असताना मिंकी झाडावर चढला. त्याने एक आंबा तोडला आणि खाल्ला. आंबा इतका गोड होता की तो आणखी आंबे तोडू लागला. बघता बघता त्याच्या आजूबाजूला आंब्यांचा ढीग जमला. पण जसेच त्याने अजून एक आंबा तोडण्यासाठी हात पुढे केला, झाड जोराने हलले, आणि त्याच्या फांद्यांनी मिंकीला घट्ट धरलं!

गोंधळून गेलेल्या मिंकीने रडायला सुरुवात केली, "अरे बापरे! मी पुढे कधीच लालच करणार नाही, हे खरं!" पण झाड शांतच राहिलं.

सकाळी जंगलातील इतर प्राणी झाडाखाली जमा झाले आणि मिंकीच्या फजितीवर हसू लागले. एका शहाण्या पोपटाने मिंकीला सल्ला दिला, "मिंकी, झाडाची माफी माग आणि त्याच्या नियमांचं पालन करण्याचं वचन दे."

मिंकीने मान डोलावली आणि म्हटलं, "ओ जादुई झाडा, मला माझ्या लालचासाठी माफ कर. पुढे मी फक्त हवं तेवढंच घेईन."

झाडाने त्याला सोडून दिलं, आणि मिंकीने इतर प्राण्यांसोबत आंबे वाटले. त्या दिवसापासून, मिंकीने झाडाच्या नियमांचं पालन केलं आणि सर्वांशी आपलं अन्न शेअर केलं!

https://dc.kavyasaanj.com/2025/01/minki-ani-jaduche-mango-tree.html

तात्पर्य (Moral of the Story): लोभामुळे संकट येते, पण वाटल्याने आनंद मिळतो!



Sunday, 12 January 2025

बंडूची हरवलेली चप्पल

एकदा काय झाले, एका गावी बंडू नावाचा खट्याळ मुलगा राहत होता. बंडूला धावायला, उड्या मारायला आणि सगळीकडे गडबड करायला खूप आवडायचं. पण त्याचा एक प्रॉब्लेम होता – त्याच्या चप्पला नेहमी हरवायच्या!

एके दिवशी त्याच्या आईने नवीन चप्पल आणून दिल्या. “बंडू, या चप्पला हरवू देऊ नकोस हं,” असं तिने सांगितलं. बंडूनेही वचन दिलं की तो चप्पल जपून ठेवेल.

दुसऱ्याच दिवशी, बंडू मैदानावर खेळायला गेला. तो खेळताना इतका गुंग झाला की चप्पल कुठे काढून ठेवली हे विसरून गेला. घरी परतल्यावर आईने विचारलं, “बंडू, चप्पल कुठे आहे?”
बंडू बिचारा गोंधळून म्हणाला, “आई, चप्पल... त्याही खेळायला गेल्यात वाटतं!”

आईने डोक्याला हात लावला आणि म्हणाली, “उद्या जरा त्या चप्पलांना शोधायला जा!”

दुसऱ्या दिवशी बंडू चप्पल शोधायला मैदानावर गेला. तिथे चप्पल त्याच्यावरच ओरडायला लागल्या, “आम्हाला इथं पडलं ठेवलंस आणि स्वतः मोकळं झालास का?”

बंडू घाबरून म्हणाला, “सॉरी, सॉरी! आता तुम्हाला परत हरवू देणार नाही!” चप्पलही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या, “ठीक आहे, पण पुढच्या वेळेस आम्हाला असं एकटं सोडू नकोस!”

त्या दिवसापासून बंडूने आपल्या चप्पलांचा व्यवस्थित सांभाळ केला, पण मित्रांसमोर नेहमी त्यांची गमतीदार तक्रार सांगत असे!
https://dc.kavyasaanj.com/2025/01/Bandu-ani-harvalelya-chapla.html



तात्पर्य (Moral of the Story):
आपल्या वस्तूंची काळजी घ्या, नाहीतर त्या बोलायला लागतील!
https://dc.kavyasaanj.com/2025/01/Bandu-ani-harvalelya-chapla.html



Friday, 10 January 2025

अशी आठवण

वाटलं होतं आज तरी
नाही येणार आठवण 
पण कळलंच नाही कधी
येवून गेली ती आठवण

काय-कोठे असते आठवण
मनाच्या कोपऱ्यात की 
मेंदूच्या नसानसांमधे 
साठवलेली असते आठवण

सुखांचे दिवस हसवतात
आठवणीत मात्र झुरवतात 
दुःखाचे प्रसंग रडवलेले
आठवणीत तुडुंब हसवतात

आठवण असते तरी काय 
कोणाची काय अन् कोणाची काय 
आठवण असतेच तरी का 
कोणासाठी हाय तर कोणासाठी बाय

रडता रडता खदखदते
हसता हसता शहारते
आठवणच करून देते 
आठवणींना रान मोकळे

आठवणी एकांतात येतात 
एकांत आठवणी आठवतात 
आवड-निवड-साथ-सोबत 
मग सारं सारं आठवतात

शरदचं चांदणं आठवतं 
आईचं गोंदण आठवतं 
शाळेतलं गोंधळ आठवतं 
अन् मन पुन्हा गोंधळतं

आठवणींना रंग नसते 
माहित नाही वेळ म्हणजे 
अधिवेशनाखातर जमते 
कुठेतरी लांब नेवून सोडते

मनाची पाऊलं मग 
हळूच पायवाटेनं धावते 
कशाची सोबत कशाची साथ 
दुरुनच पाऊलखुणा ठेवून परतवते

एकच आस असते आठवणींत  
एक-एक क्षण बसवते आठवीत 
एक एक करता येतात कैक 
मन मात्र रडवते आठवणींत

आठवणींना ऋतू नसतो 
साठवणीचा मोसम नसतो 
कधी (?) कसा (?) देव जाणे 
दडलेला मात्र आठवणीत असतो

कंठ दाटून आणते 
का बरी आठवण 
अन् मन भरून आणते
का अशी आठवण...!!! 
https://dc.kavyasaanj.com/2025/01/ashi-aathwan-by-dhananjay-choudhari.html


कवी - धनंजय चौधरी 
(06 Oct 2011)
https://dc.kavyasaanj.com/2025/01/ashi-aathwan-by-dhananjay-choudhari.html