Saturday, 26 December 2020

भेसळ स्वप्नांची

झोपेत सालं कोण करतंय भेसळ स्वप्नांची
स्वप्नांमध्ये कोण मिसळतं कात्र्या
कुठूनही काहीही कापून टाकणाऱ्या
मिठी कापतात चुंबन कापतात आणि
कमरेखालचं आणि वरचं शरीर कापून ठेवतात

जिभेवर थर चढवतात
आधी पांढरे मग पिवळे मग काळे
सुतं काढतात प्रेमाची प चे पन्नास तुकडे
र तर आधीच अर्धा
म ला अंगावर घोंगडं टाकून बडवतात बडव बडव

एकही नंबर नसतो जो डायल करावा
एकही नाव नसतं पुकारायला
कित्ती कापूस पिकलाय कित्ती कानांत बोळे

झोपेत तहान लागते सारखी
झोपेत भूक लागते सारखी
झोपेत आवळतात मुठी घातल्या जातात लाथा
अधांतरात सगळं
सकाळी फक्त अगणित सुरकुत्या चादरीवर
चादर झटकली की त्या सगळ्या कपाळावर
येऊन बसतात आठ्या बनून

झोपेच्या गोळीने घट्ट आटून येतो काळ
गर्द होतात स्वप्नं
आता स्वप्नातही दिसत नाही प्रियकर
आता स्वप्नातही येत नाही कुणाचा फोन
भिंतींच्या आरपारचं दिसायचं स्वप्नात
सीमांच्या पल्याडचं दिसायचं

किती बारीक कातरते ही कात्री
कळत नाही की कातरलं ते स्वप्नच आहे
की झोपेचे आहेत हे आखीव कागद
की माझं अख्खं शरीरच आहेय हे
की
कातरून ठेवलीये कुणी पातळ रेष
वास्तव आणि स्वप्नातली

नासमझ
सारं

https://dc.kavyasaanj.com/2020/12/bhesal-swapnanchi-by-kavita-mahajan.html

कवयित्री - कविता महाजन 





No comments:

Post a Comment