Sunday, 31 May 2020

मैत्री


जीवनाच्या वाटेवर मित्र भेटतात
सुखाची सोबत क्षणाची देतात
क्षणात भेटून निघून जातात
आठवणीत मात्र तेच राहतात
मनाच्या कोपऱ्यात ठसा उमटवतात
मैत्रीची जाणीव ठेवून जातात
काही इच्छा मोठ्या असतात
अर्धवट ठेऊन निघून जातात
काही काळाने स्मरणी येतात
डोळ्यात अश्रू हळूच देतात
पण तेव्हा ते या सृष्टीत नसतात
जागाच्या पडद्याआड विरून जातात
आणि मैत्रीच्या नात्यात अमर होतात.

कवयित्री - कावेरी डफळ





Saturday, 30 May 2020

हरकत नाही


जातो आहेस हरकत नाही
ओघळणारे अश्रू पाहून जा...

नाते तोडतो आहेस,हरकत नाही
विझता श्वास पाहून जा...

जाणूनही सारे संपवताना
हीच एवढी विनंती

हसतो आहेस ,हरकत नाही
बुडती नाव पाहून जा...

जाळतो आहेस ,हरकत नाही
पण, जळणारे गाव पाहून जा...

कवयित्री - कावेरी डफळ




Friday, 29 May 2020

"मना" नाते तुझे नि माझे.....


आजच्या एकाकी क्षणी
मन माझं खूप रडलं
जे नको होते तेच
माझ्या जीवनी घडलं....

अश्रूही आज पापण्यांवर
जणू अडुनी बसले
जाताना तरी सांग मजला
मना,तुझे नि माझे
हे नाते कसले?

तुटले पाश पुन्हा त्या
रम्य -गोड आठवणींचे
ऐक सांगतो मी आज तुला
तुझे नि माझे नाते
आहे शब्दापालिकडचे.....

कवयित्री - कावेरी डफळ




Thursday, 28 May 2020

हे स्वातंत्र्यवीरा


प्रयाग काशी केदारनाथ,
गाजली आहेत चारीधाम...
जीवनी सेल्यूलर कारागृहाचे,
दर्शन म्हणजे परमधाम...!!

बारा ज्योतिर्लिंगे द्वारका,
पवित्र मानतात सर्वत्र...
तोवरी जीवन सार्थकी नाही,
न देखिले अंदमान तीर्थक्षेत्र...!!

प्रवेशद्वारी पाऊल पडता,
प्रचंड हुंदका आला...
ऐकू आला एक नाद मज,
सागरा प्राण तळमळला...!!

हिमालयासम उत्तुंग तू
आकाशासम असीम तू...
सागरासम प्रचंड तू...
शतशः नमन स्वीकार तू...!!!

कवयित्री - सुधा नरवाडकर




Wednesday, 27 May 2020

आता मात्र हे चालणार नाही....



आता मात्र हे चालणार नाही,

आणि पत्त्यांच्या खेळामधला

मी गुलाम होणार नाही.

लेक्चर चालू असताना

तुला चोरून चोरून पाहावं

तुही पाहता पाहता

हळूच तोंड लपवाव

सरांनीही नेमकं मलाच पकडाव

आणि वर्गाच्या बाहेर काढावे.......

फिरायला जाण्याचं गोड गुपित

मी तुला सांगावं

मनात सारं असूनही

तू बळचच हो म्हणावं

दोघांतच ठरलेले असताना

तू मैत्रिणीही सोबत आणावं

मैत्रिनही इतकी हुशार

की तिने साऱ्या गावाला सांगावं......

जाण्या- येण्याचा सारा खर्च

मी मनमोकळेपणाने करायचा

हॉटेलचं बिल देतानाही त्याचा

विचार नाही करायचा

मी हात पुढे केल्यावर

तू मात्र मैत्रिणीचा हात धरायचा

आणि सारा खर्च असाच वाया जायचा.......

आता मात्र हे चालणार नाही......

आता व्हायचंय ते होऊदे

माझ्यासारख कधीतरी तिलाही झुरु दे

माझ्याहि मित्रासोबत तिलाही फिरू दे                     

आणि फिरण्याचा खर्च कधीतरी

तिलाही करू दे

लेक्चर चालू असताना

तिलाही बाहेर जाऊदे..

आणि प्रेम म्हणजे काय असत

हे फक्त एकदा तिला कळू दे.....



कवयित्री - कावेरी डफळ





Tuesday, 26 May 2020

कौशल्य


खरं कौशल्य असतं ,
दुःखाला सामोरं जाण्यात.....
जमिनीवर राहूनही,
आकाशात उडण्यात.....

खरं कौशल्य असतं,
मनासारखं न घडूनही हसण्यात.....
प्रतिकुलतेतही स्वतःच
नशीब घडवण्यात.....

खरं कौशल्य असतं,
अंधारातही उजेड शोधण्यात.....
ओलं न होताही,
पावसात भिजण्यात......

जसं सावलीला प्रकट
व्हायला ऊनच लागतं....
चांदण्यांना महत्व,
अंधारामुळेच येतं.....

तसं नातं सुख-दुःखाचं असतं,
आणि खरं कौशल्य,
ते ओळखण्यात असतं....

कवयित्री - कावेरी डफळ




Monday, 25 May 2020

वेंधळी


उगाच शब्द जात राहिले
मनातले मनात राहिले
मनातलं म्हणू....म्हणून मी
निरर्थ गीत गात राहिले.

असून तो पुढ्यात... मी खुळी
इथे तिथे पहात राहीले
जपून भाव ठेवले तरी
स्वतः मध्ये रमत राहिले

विहारुनी निळ्या ढगांमध्ये
उन्हात मी नहात राहिले
निरोप घेत राहिले उभी
हवेत फक्त हात राहिले

अशी काशी मी वेंधळी
सोबत असूनही तो
मी अनाथ राहिले
मी अनाथ राहिले.

कवयित्री - कावेरी डफळ 




Sunday, 24 May 2020

भाऊ

लहानपणी पडताना
सावरणारा भाऊ असतो....
रडणारे डोळे पुसणारा आणि
हसवणारा ही भाऊच असतो....

बाहेर जाताना सदैव तुमच्यावर
लक्ष ठेवणारा भाऊ असतो.....
प्रसंगी तुमच्यासाठी बाबांचा
ओरडा खाणारा ही भाऊ असतो.....

कॉलेजला गेल्यावर गप्पा
रंगवून सांगणारा भाऊ असतो ......
पाऊल चुकीचं पडू नये म्हणून
समजून सांगणारा ही भाऊच असतो.....

बहिण सासरी जाताना गुपचुप
सर्वात जास्त राडणारा भाऊ असतो.....
सासरी काहीही होवो मी आहे
असा विश्वास देणारा ही भाऊच असतो...

https://dc.kavyasaanj.com/2020/05/Bhavu-kavita-by-kaveri.html

कवयित्री - कावेरी डफळ





सुख शोधता आलं पाहिजे


आयुष्याच्या उणेपणातही,
सुख शोधता आलं पाहिजे.....
विखरून गेलं आयुष्य तरी,
तोलून सावरता आलं पाहिजे.....

जिथे दिसेल अन्याय तिथे,
पेटून उठता आलं पाहिजे.....
एखाद्याच्या अंधारलेल्या आयुष्यात,
दिवा होता आलं पाहिजे.....

भंग पावलेल्या स्वप्नांना
कवटाळून न बसता ,
नव्यानं उभं राहता आलं पाहिजे......

दगड होऊन निष्क्रिय
अमरत्व मिळवण्यापेक्षा
पणातीप्रमाणे अल्पायुषी असूनही
दुसऱ्यासाठी जळता आलं पाहिजे....

आयुष्याच्या उणेपणातही
सुख शोधता आलं पाहिजे.....

कवयित्री - कावेरी डफळ




Saturday, 23 May 2020

दहशतवाद


काहींचे देह सांगतात
अमरतेची भीषण गाथा
मातृभूमीच्या सार्वभौमत्वासाठी
कित्येकांचा छेदीला माथा........

बालवृद्ध, नर- नारी होतात
शिकार बॉम्ब आणि गोळ्यांचे
अमानवी आणि पाषाण हृदयाच्या
त्या श्वापदी टोळ्यांचे.......

कसले धर्म  आणि कसला वाद
माणसाला कुठे ऐकू येते
माणसाने घातलेली साद
घुमतो  फक्त स्वार्थाचा निनाद.....

एखाद्याच्या महत्वाकांक्षेचा सुरुंग
करतो माणुसकी बरबाद
रंजल्या- गांजल्यांना फितवून
सुरू होतो तो दहशतवाद......
सुरू होतो तो दहशतवाद.......

कवयित्री- कावेरी डफळ




Friday, 22 May 2020

अर्थ


समजूत घालणारं कुणी असेल
तर रुसण्याला अर्थ आहे.

पाहणारं कुणी असेल
तर दिसायला अर्थ आहे.

प्रतिसाद देणारं कुणी असेल
तर साद घालण्याला अर्थ आहे.

आपलं कुणी असेल
तर जगण्यालाही अर्थ  आहे.

कवयित्री - कावेरी डफळ

 





Thursday, 21 May 2020

स्वप्नात येऊन जा


खूप रडायचं तुझ्या कुशीत
एकदा मनसोक्त रडू दे
मग वाटल्यास निघून जा....

कोमेजून गेलंय माझं
एकाकी जीवन तुझ्या दोन
गोड शब्दांनी फुलवून जा.....

एकाकी जीवन जगायचंय
आता त्यासाठी तरी ये
काही आठवणी जगण्यासाठी देऊन जा.....

सत्यात नाही ते नाही
पण एकदा तरी ,स्वप्नात येऊन जा
स्वप्नात येऊन जा......

कवयित्री - कावेरी डफळ 




Wednesday, 20 May 2020

पाखरं


रात्रभर जागून
कॅनव्हासवर
तू काढलेल्या चित्रातली
दोन निर्मम पाखरं
तुला न सांगता
बिनबोभाट उडून गेली
म्हणून तू उद्विग्न होऊ नकोस
अग, पाखरच आहेत ती
कॅनव्हासवरची असली म्हणून काय झालं
चित्रात तू रंगवलेलं
हिरवं झाड मात्र
शेवटपर्यंत असच सळसळत
ठेव म्हणजे झालं....

कवयित्री - कावेरी डफळ 







Tuesday, 19 May 2020

सख्या रे


सख्या रे कसले हे बंध
जणू वाटे पूवजन्मचे ऋणानुबंध
पुष्प-सुमनांचा सुगंध की
स्वर्गविहाराचा आनंद

भेटता सख्या तू मला
गवसले नवे क्षितिज मजला
देण्या आयुष्याची प्रीत
जाहले सख्या तुझी मित

पडता अक्षदा डोईवरती
आनंदला ही आली भरती
एकमेकांना देऊनी साद
एकची झाला शंख नाद

ना तूटो कधी ही ओढ अंतरीची
ना विरह कधी होवो
श्वास तुझा नि माझा
जन्मोजन्मी एकरूप राहो.....


कवयित्री - कावेरी डफळ




Monday, 18 May 2020

यात्रेकरी



उदासीचे मेघ हे,दाटून येती कधीतरी

जन्म मृत्यूच्या या टोकांमध्ये

आयुष्य लटकते अधांतरी



अधांतरी आयुष्य वाहू तरी कुठवरी

अश्वत्थाम्याचे दुःख समजले

समजली त्याची व्यथा खरी



खरी व्यथा जगण्याचीच असते

मरण वरदान असले जरी

आंधळ्या प्रवासातून लागेल काय

या हाती तरी?



हाती काय अन काय माथी

शून्याचीच वर्तुळे सारी

जीवशिवाची भेट घडेस्तो

परिघावरचा मी यात्रेकरी......


कवयित्री  - कावेरी डफळ




Sunday, 17 May 2020

शब्द सोहळा


आज माझा देह सारा ,आनंदुनि गेला,
शब्द झाले मित्र,खेळ शब्दांशी मी केला.

आता ना भय कसले,आता ना दुःख उरले,
माऊलीसारखी माया त्याची या जीवाला.

झाले शब्दांची मी पुजारी,हीच रे माझी पंढरी,
करिते आहे वारी, मी शब्दांचा वारकरी.

शब्दांनी असा माझ्या जिवा लाविला लळा,
शब्द शब्द माझी शक्ती,शब्द हीच माझी भक्ती.

मांडीला कृपेने तुझ्या......
हा शब्द सोहळा......हा शब्द सोहळा…..

कवयित्री - कावेरी डफळ 




Saturday, 16 May 2020

गैरसमज

मैत्री केली तुझ्याशीच
प्रेम मात्र कधीच नव्हतं
तू असा अर्थ घ्यावास
अस कधीच घडलं नव्हतं
प्रेमापेक्षा पवित्र नातं
फक्त आपल्या मैत्रीचं होतं
या व्यतिरिक्त काहीच नव्हतं
तू उगीचच माझ्यात गुंतत गेलास
मला असं कधी वाटलंच नव्हतं
विसरण्याची सुरुवात तू करावीस
कारण....
मला कधी काही आठवलंच नव्हतं.

कवयित्री - कावेरी डफळ




Friday, 15 May 2020

प्यार और धोका


हमने भी किसींसे नाता जोडा था,
उनके लिये अपनो का साथ छोडा था,
उसिने मेरे जिंदगीका रुख मोडा था,
जिन्हों नेभी मेरा दिल तोडा है,
उनके नाम मे उसका नाम भी अब जोडा है।

मुश्किले बहुत आई,तुफान भी बहुत आए,
फिर भी ये कदम कभी ना लडाखडाए,
सूनकर 'तेरी बेवाफाई का शबाब,
दिल मेरा अब तक है, तडफडाए।

जबतक थे आप हमारे पास
दुरियो का न था एहसास,
जब से है नसीब ने हमे टोका,
तब से खा रहें है हम,
हर कदम कदम पर
हर एक नया धोका।

क्यो बनाते है लोग यार?
क्यो करते है लोग प्यार?
ना मिले किसीं को किसींसे
कभी प्यार में गम
इसिलीये कहती हूं मेरे दोस्त
प्यार करो मगर थोडा कम.....

कवयित्री  - कावेरी डफळ 




Thursday, 14 May 2020

काव्य


अमृतासम परम महान
ऐसी काव्याची ही गोडी
मनाच्या तरल भावनांना
काव्य  शब्दा शब्दा ने जोडी

दिसे जे जे रवी-भास्करास
ते ते सारे असते काव्यात
जे ना दिसे लोचना पर
कामना असे अंतर मना
तीही बने काव्य भावना

वाटे मज आता काव्य वाचावे
काव्य लिहावे,काव्य वदावे
काव्यमय होऊनी जावे
अन........काव्यरूपी उरावे
                               
कवयित्री - कावेरी डफळ
   




Wednesday, 13 May 2020

मुसक्या


"मुसक्या" म्हटलं की आठवतो
तो शेतात राबणारा बैल
न थांबता काम करत राहतो
जरी नाका तोंडातून चालला फेस

त्याची होत असेल दमछाक
त्यालाही हवा असेल थोडा विसावा
पण माणसाच्या असुडा समोर
करेल फक्त ती डोळ्यांची उघडझाप

काळ कुणाचंही उक्त ठेवत नाही
जशी करणी तशी भरणी
असं काय उगाच म्हणत नाही

आज माणूसही घुसमटतोय
तोही आतून तडफडतोय
आणि बैलाकडे पाहून म्हणतोय
खरंच तुझी व्यथा काय होती
ती आज मी अनुभवतोय

आज बैलही आहे आणि माणूसही आहे
फरक फक्त इतकाच की
बैल मात्र मोकळा श्वास घेत आहेत
आणि माणसाच्या तोंडाला
मात्र "मुसक्या" लागल्या आहेत

कवयित्री - कावेरी डफळ 




Tuesday, 12 May 2020

जीवन


जन्माला आलोच आहोत

तर आनंदानं जगावं

जगणं कठीण व मरण सोपं असतं

वेदना सोसून बघावं....



आयुष्यात दुःख आहे तर

त्याकडे दुर्लक्ष करावं

ध्येय समोर ठेऊन

यशाची वाट पाहावी....



अपयश येतच असतं

पण माघार घ्यायची नाही

जीवनच्या कल्पना रंगवाव्यात

त्यासाठी मेहनत करून बघावं....



जीवन मरण एक प्रकारचं कोडं आहे

आयुष्यात एकदा सोडवून बघावं


कवयित्री  - कावेरी डफळ 




Monday, 11 May 2020

जैसे थे..!!

बर चाललंय म्हणता म्हणता सगळ्यालाच पुन्हा ब्रेक लागला

दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न पुन्हा आ वासून उभा राहिला

कोण्या एका बाहेरल्या पाहुण्यामुळ ही अवस्था झाली

साला आपली परस्थिती मात्र जैसे थे च राहिली...||


लै वर्षांनी गड्या रिकाम्या हातानं गावाकडची वाट धरली

खायाला काय, करायचं काय, लेकरांच काय हीच कोडी सतत समोर यायला लागली

बोटं दाखवायला समदी पुढं, काम द्यायला मात्र हाताची घडी

साला आपली मात्र परस्थिती मात्र जैसे थे च राहिली...||


काल पातूर बघितलेल्या सपनांचा पाक चेंदामेंदा झाला

चटके खात पायपिटीचा शेवटचा दिवस म्हणतं प्रवास तसाच चालू राहिला

साहेब व्हायचं स्वप्न बघणारी लेकरं परत दुसऱ्यालाच सलाम करतील ही धाकधूक वाढली

साला आपली परस्थिती मात्र जैसे थे च राहिली…..||


सापडलेली जगण्याची लय पुन्यांदा हवेत विरून गेली

आजचा दिस दोन वेळच खाऊन जाऊदे म्हणतं हात जोडायची वेळ आली

बोचकी बांधून बाहेर पडताना हिथ आपल काय नाई ह्याची खात्री झाली

साला आपली परस्थिती मात्र जैसे थे च राहिली….||


अखेर दारात पाय पडला तवा कुठं जीवात जीव आला

लेकरानी घट्ट धरलेला अंगठा रडायला भाग पाडून गेला

पून्यांदा शहराची वाटच नग म्हणतं एकदाची घरी पाठ टेकली

साला आपली परस्थिती मात्र जैसे थे च राहिली..||


कवी - अमेय ओक  




Sunday, 10 May 2020

जा दिले मन तुला

जा दिले मन तुला कर त्याचे तू काही

दिले दान पुनः घेणे माझ्या स्वभावात नाही ॥धृ॥

फुल मनाचे खुडून दिले तुझ्या हातात

ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत

देठ तुटल्या फुलाला भय निर्माल्याचे नाही ||१||

तुला द्यावे मन असे काही कारण नव्हते

एवढेच म्हणू आता तुझ्या नशिबात होते

पडे त्याच्या हाती दिवा ज्याला दिसतच नाही ||२||

मनाविण जगताना, वाटे मलाही बरेच

आता दुःख-बिख नाही वाटे आश्चर्य सखेद

मला एक मन भारी तुला दोन्ही जड नाही ॥३॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही...
दिले दान पुन्हा घेणे
माझ्या स्वभावात नाही…

कवी - संदीप खरे






Saturday, 9 May 2020

एकांत माझ्या जीवनी

एकांत, याचेही आपले असे एक विश्व आहे
भावनांच्या जंजाळात तोही तितकाच त्रस्त आहे

कधी भेटे मला सहजची दुःख त्याचे घेऊन
अंधाराच्या सोबतीने रात्र त्याची व्यस्त आहे

माणसांच्या भरल्या बाजारी हा एकटाच आला फिरून
म्हणे त्या गर्दीमध्ये शांतता दुरापास्त आहे

इतकेच काय जेव्हा हा परतला मैफिलीत रंगून
मुखवट्यांच्या स्पर्धेत म्हणे जीवन एक फार्स आहे

कधी अचानकच उगवे हा सुखाचे भरते येऊन
म्हणतो आनंदाच्या डोहांचा तळ सुंदर आहे

कधी नकळत आठवणीत तिच्या विसरे हा भान
म्हणे भूतकाळाच्या शिंपल्यांचा रंग मस्त आहे

वर्तमानाच्या मिठीत जेव्हा ना दिसे तिचे स्थान
म्हणे जीवनात इंद्रधनूच्याही बेरंगीच अस्त आहे

कधी रमता भविष्याच्या मोहात भुले हा अजाण
अशक्य या स्वप्नांच्या वारुंचा वेग थोडा जास्त आहे

निष्ठावंत हा भलताच न जाई कधी सोडून
मनाच्या गाभारी सदैव याचा वास आहे

गर्दीत मी असतानाही सदैव तो आसपास आहे
एकांत माझ्या जीवनी थोडासा खासच आहे

एकांतास माझ्या जरी या एकटेपणाचा शाप आहे
अज्ञाताच्या सोबतीची रोजच त्याला आस आहे..

एकांत माझ्या जीवनी थोडासा खासच आहे...

कवी - तृषांत (तेजस घोरड)




Friday, 8 May 2020

अलामत


सर झुकाओगे तो पत्थर देवता हो जाएगा
इतना मत चाहो उसे, वो बेवफ़ा हो जाएगा ।

हम भी दरिया हैं, हमें अपना हुनर मालूम है
जिस तरफ भी चल पड़ेंगे, रास्ता हो जाएगा ।

मैं ख़ुदा का नाम लेकर पी रहा हूँ दोस्तो
ज़हर भी इसमें अगर होगा, दवा हो जाएगा ।

रूठ जाना तो मुहब्बत की अलामत है मगर
क्या ख़बर थी मुझसे वो इतना ख़फ़ा हो जाएगा ।

कितनी सच्चाई से मुझ से ज़िन्दगी ने कह दिया
तू नहीं मेरा, तो कोई दूसरा हो जाएगा ।

सब उसी के हैं, हवा, ख़ुश्बू, ज़मीन-ओ-आसमाँ
मैं जहाँ भी जाऊँगा, उसको पता हो जाएगा।

(अलामत = निशानी, पहचान)

 शायर - बशीर बद्र




Sunday, 3 May 2020

सौंदर्य

सौंदर्य असावे फुलासारखे
उमलणारे, फुलणारे
हवेत झुळणारे
भ्रमराला खेळावणारे, गंध उधळणारे ||

सौंदर्य असावे स्त्रीसारखे
रंभा,उर्वशी,अप्सरा
मेणकेसारखे नजरेत भरणारे
काळजात भिडणारे ||

सौंदर्य असावे रत्नकरसारखे
गरजणारे,फेसळणारे
लाटांशी खेळणारे
तुषारांची बरसात करणारे ||

सौंदर्य असावे धबधब्यासारखे
खळखळणारे,कोसळणारे
मुक्तपणे रंग उधळणारे
सूर मारणारे ||

सौंदर्य असावे गर्द वनराईसारखे
हिरवेगार ,डौलदार
पानापानातून सळसळणारे
वाऱ्याशी खेळत पिंगा घालणारे ||

कवयित्री  : कावेरी डफळ 




मी हजार चिंतांनी

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो

मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

कवी - संदीप खरे  




Friday, 1 May 2020

स्वप्न - गोडी

आता गोडी संपलीय
नित्यनेमाने क्षणोक्षणि
स्वप्न रंगवण्याची
तिच्या मिलनाची

पूर्वेला सूर्य वर येताना
सुखावतो वारा पश्चिमेचा
दक्षिणेचा लांबच लांब रस्ता
वाट पाहायला लावतो आनंद उत्तरेचा

क्षणात धुंद होते मन
शहारते माझे तन
पण नकोसं  वाटतंय
हल्ली तन-मन-धन

मोहरलेला समीर हा
आजकाल शहारत नाही
हिरवी शाल पांघरलेली
धरणीमाय हसतच नाही

रडतो उंच नभी
पौर्णिमेचा चंद्र
जणू त्याचे अश्रू
म्हणजे सकाळचे दव

कळतंय , समजतंय
आज हे मला
अमावसेला चांदोबा
उगवणार तरी कसा

माझ्यासाठी चांदणी
येईल तरी कशी
सुट्टीच्या दिवशी कामाला
अन् तेही बिनपगारी

माझेच शब्द माझ्यावर
हुकुमत गाजवतात
कल्पनेच्या दुनियेत सुद्धा
तिला भेटण्या पासून अडवतात

कुणाची जर असेल ‘ओळख’
तर सांगा त्या नियतीला
‘नशीब’ जरी असेल ठरलेलं
निदान स्वप्नामध्ये तरी ‘भेटू’ द्या!!!

https://dc.kavyasaanj.com/2020/05/swapn-godi.html

- धनंजय चौधरी





- धनंजय चौधरी