Saturday, 1 December 2018

झोपेवरची मात्रा

स्वप्नातल्या स्वप्नातल्या स्वप्नात
झोपेची गोष्ट हरवून गेली
शब्दांच्या भुतांनी मानगुट पकडली
आणि
निद्रेची उरलीसुरली झापडं
भिरकावून लावली

हाणून पाडले
कवितेच्या कत्तलीचे सारे प्रयत्न
आश्रितासारखं बसायला लावलं
भाषेच्या दाराशी
तेंव्हा
एक परका आवाज सांगत राहिला,
'झोपेवरची मात्रा हवी असेल
तर शब्दांना जोजव बाई'

न जाणे
कुठल्या वेदनेचे टाके शिवायचे असतात
कवितेला मध्यरात्री
एक असह्य गहिवर ऐकू येतो
ऊबदार रजईत
रंध्रात अवकाळी थरकाप उठतो
आणि स्वतःसाठीच
गावी वाटू लागते अंगाई .

कविते,
इतकं उपरं करू नको जगण्यापासून
मी एखादं मखर सजवेन
एखाद्या दगडाला शेंदूर फासून
टाळ पिटत राहीन
शब्दांचा माज उतरवता येतो कधी कधी,
भित्र्या माणसालाही .

कवयित्री - योजना यादव 




Tuesday, 17 April 2018

मधुघट

मधु मागशि माझ्या सख्या परी,
मधुघटचि रिकामे पडती घरी

आजवरी कमळाच्या द्रोणी
मधु पजीला तुला भरोनि,
सेवा हि पूर्वीची स्मरोनी,
करी रोष न सख्या, दया करी

नैवेद्याची एकच वाटी
अतां दूधाचि माझ्या गाठी,
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशि तरी

तरुण-तरुणीची सलज्ज कुजबुज
वृक्ष-झर्यांचे गुढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज ,
मधु पिळण्या परी रे बळ न करी

ढळला रे ढळला दिन सख्या
संध्याछाया भिवविती हृदया,
अतां मधुचे नांव कासया?
लागले नैत्र रे पैलतीरी

– भा. रा. तांबे




Thursday, 8 March 2018

मी एकटीच माझी असते

मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी

येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला नुसते कधीकधी

जपते मनात माझा एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी

मागेच मी कधीची हरपून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी

कवी - सुरेश भट





Tuesday, 6 February 2018

सारेच दीप कसे मंदावले आता

सारेच दीप कसे मंदावले आता
ज्योती विझू विझू झाल्या
की झड घालून प्राण द्यावा पतंगाने
असे कुठेच तेज नाही !
थिजले कसे आवाज सारे?
खडबडून करील पडसाद जागे 
अशी कुणाची साद नाही?
या रे या ! द्या जीव या बाणीवर
अशी वाणी निघत नाही
 भावनाना चेव नाही
यौवना आव्हान नाही
संघर्ष नाही झुंज नाही
जावे ज्या मागे बेधड़क
असा झुंजार वीर नाही
कामी यावा देह जिथे
असा रणसंग्राम नाही !
प्रेतेही उठतील अशा
मंत्राचा उदघोष नाही !
आशांचा हिरमोड
आणि बंडांचा बिमोड
सारीकडे तडजोड
होऊन, सारे कसे सर्दावले आता?
सारेच कसे थंडावले आता !
साऱ्याच आघाड्यावरी ही अशी हो सामसुम !
वरतीखाली सामसूम
इकडेतिकडे सामसूम
आजूबाजूस सामसूम
जनमनांतहि सामसूम
हृदयातहि सामसूम
कुठे पोटतिडिक नाही
प्रेमामधेही धडक नाही
जीव ओढून घेईल अशी
डोळ्यामध्ये फडक नाही
तारुण्याची चमक नाही,धमक नाही
साहित्यात चैतन्य नाही
संगीतात इंगित आणि कलेमध्ये उकल नाही
सरळपणाला भाव नाही
साधा सदाचार नाही
जो तो कसा लाचार आहे
ह्याची त्याला फूस आहे
घराघरात घूस आहे !
तेरी चुप मेरी चुप 
गुपचुप
सारा हिशेबी व्यवहार आहे !
जो तो जागा धरून आहे
नाही तर अडवून आहे
दबेल असून चढेल आहे
योजनांची चळत आहे
परकियांची मदत आहे
तज्ञाचीहि उणीव नाही
आपली जाणीव नाही !
त्याग त्यागिले भोग मागे
दाता दिनयाचना मागे
शील आपले मोल मागे
सौंदर्याची विक्री चाले
कागदांच्या कपटयांवर !
सारीं स्वरूपें कुरूप झाली
हुरूप कशाचा नाही चित्ता !
सारेच दीप कसे मंदावले आता !!

https://dc.kavyasaanj.com/2018/02/sarech-deep-kase-mandavale-by-kavi-anil.html

कवी - अनिल (आत्माराम रावजी देशपांडे)
(काव्यसंग्रह: "कविता शतकाची", शब्द प्रकाशन)