Sunday, 1 December 2019

दख्खन राणी

दख्खन राणीच्या बसून कुशीत
शेकडो पिले ही चालली खुशीत

सुंदर मानव तुंदिल अंगाचे
गालिचे गुलाब शराबी रंगाचे
ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी
गोजिरवाणी लाजिरवाणी
पोरटी घेऊन पोटाशी कुशीत
दख्खन रानी ही चालली खुशीत

निसर्ग नटला बाहेर थाटात
पर्वत गर्वात ठाकले थाटात
चालले गिरीश मस्तकांवरून
आकाशगंगांचे नर्तन गायन
झेलून त्यांचे नुपूर घुंगुर
डोलती डौलात दुर्वांचे अंकुर
मोत्यांची जाळी घालून भली
रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल
दख्खन राणीला नव्हती दखल

ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र
राहिले उभे हे शतके सहस्त्र
त्याच्याही पाषाण हृदया कळाली
सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी
नीला तो तलाव तांबूस खाडी ती
पांढरा प्रपात हिरवी झाडी ती
अवतीभवती इंद्राची धनुष्ये
दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये

दख्खन राणीच्या कुशीत पोटात
बुडाली जाणीव चहाच्या घोटात
किलवर चौकट इसपिक बदाम
फेकीत फेकीत जिंकित छदाम
नीरस पोकळ वादांचे मृदंग
वाजती उगाच खमंग सवंग
खोलून चंची पोपटपंची
करीत बसले बुद्धीचे सागर
दख्खन रानी ही ओलांडे डोंगर

धावत्या बाजारी एकच बालक
गवाक्षी घालून बसले मस्तक
म्हणाले "आई गं, धबधबा केवढा
पहा ना चवेणी, पहा हा केवडा
ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात
डोंगर नहाती पहाना टेसात"
म्हणाली आई "पूरे गं बाई,
काय या बेबीची चालली कटकट"
दख्खन राणीचा चालला फुंफाट

दख्खन राणीच्या पोटात कुशीत
शेकडो पिले ही चालली खुशीत
मनाने खुरटी दिसाया मोठाली
विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी
बाहेर असू दे उन वा चांदणे
संततधार वा धुक्चे वेढणे
ऐल ते पैल शंभर मैल
एकच बोगदा मुंबई पुण्यात
दख्खन राणी ही चालली वेगात ...
दख्खन राणी ही चालली वेगात... !!

कवी - वसंत बापट




No comments:

Post a Comment