Friday, 25 March 2022

उचकी

कोण माझी आठवण काढतंय इतक्या तीव्रतेने
मित्र की शत्रू?
मित्र ढगात पोहोचला आहे
स्वर्गात वा नरकात
त्याच्या पापपुण्याईने.

शत्रू आहे अजून मातीवरचं एक ढेकूळ
कोण माझी आठवण काढतंय
इथून वा तिथून
तिथून वा इथून?

ब्लॉक केलेले कोळसे पेटलेत
की धुमसताहेत अनफ्रेंड केलेले लोक
की रुसलेत फ्रेंड्स
पुरेसं लक्ष न दिल्याने?
कुणाच्या आहेत या उचक्या
ज्या सतत लागताहेत
गिळू देत नाहीत अन्नाचा घास
कष्टाने मिळवलेला
उतरू देत नाहीत घोट घशाखाली
साध्या निर्मळ पाण्याचा
बघ म्हणतात छताकडे
छतापलीकडच्या आभाळाकडे
तरी थांबत नाही उचकी

उचकी लागणे म्हणजे छाती व पोट यामधील पडदा
आणि बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होणे
व त्याचवेळेस स्वर यंत्रातील स्वरतंतू
व्होकल कॉर्ड एकमेकांजवळ येणे
मी वाचते माहिती उचक्या देत देत
उचकी म्हणजे असतो
स्वरतंतू जवळ-जवळ आल्यामुळे आवाज
हे वाचून देखील थांबत नाही माझी अंधश्रद्ध उचकी

माझ्या देहातून मी खेचून काढते प्रेतं
एक प्रेत धास्तीचं ज्यानं धमकी ऐकली होती
एक प्रेत भीतीचं ज्यानं दहशत सोसली होती
एक प्रेत अश्रूचं ज्यानं दु:खाचा चेहरा देखला प्रत्यक्ष
एक प्रेत प्रेमाचं ज्याला मृत्यूने कुजवलं
एक प्रेत आकर्षणाचं, ज्याची
आकर्षणवस्तू होती कमजोर आत्यंतिक
मी प्रेतमुक्त
होते जगण्याला मोकळी
व्याकरणाच्या नियमात न बसणारा
नवा शब्द

मी स्वागत करते उचकीचं
की बाई, स्वार्थहीन स्वरतंतु जवळ-जवळ आल्यामुळे
जन्मली आहेस तू.
 
https://dc.kavyasaanj.com/2022/03/uchaki-by-kavita-mahajan.html

कवयित्री - कविता महाजन





Friday, 4 March 2022

इतकी नाजुक

इतकी नाजुक इतकी अल्लड, फुलपाखाराहून हळवार,
चालू बघता नकळत होते वार्या वरती  अलगद स्वार, ...इतकी नाजुक ……. ||

भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार,
लक्ख गोरटी रापून जाली रात्रीत एका सावळनार, ...इतकी नाजुक ……. ||

इतकी नाजुक... जरा निफेनी जोर देऊनी  लिहिता नाव,
गालीत आली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हळवे घाव, ...इतकी नाजुक ……. ||

इतकी नाजुक, इतकी सुन्दर, दर्पण देखिल खुलावातो,
ती गेल्यावरती, तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो, ... इतकी नाजुक …….||

इतकी नाजुक की, जेव्हा ती पावसात जाऊ बघते,
भीती वाटते कारण जलात साखर क्षणात विरघळते, …इतकी नाजुक …….|| 

इतकी नाजुक की, आता तर स्मरणाचे भय वाटे,
नको रुताया फुलास असल्या माझ्या जीवनातील काटे ...इतकी नाजुक …….||


https://dc.kavyasaanj.com/

कवी - संदीप खरे