Tuesday, 24 November 2020

कोणीतरी रडतंय

कोणीतरी रडतंय

कोणीतरी रडतंय मगापासून

कोणीतरी रडत होतं

रात्रभर

कोणीतरी रडत बसलंय

युगानुयुग

तूच का गं

पण तू का रडते आहेस अशी

अविरत

रडायला काय झालं तुला

कोण म्हणालं का काही

कुणी मारलं का तुला

कुठं दुखतयं तुला

खुपतयं का कुठं काही

तू का रडते आहेस

एकटीच

इथं या अरण्यात बसून

की तूच हे अरण्य आहेस

रडणारं

https://dc.kavyasaanj.com/2020/11/konitari%20radatay-arun-kolhatkar.html

कवी - अरुण कोलटकर 



"कोणीतरी रडतंय" हि कविता अरुण कोलटकर ह्यांच्या 'भिजकी वही' ह्या पुस्तकातून घेतली आहे. त्या पुस्तकाची लिंक सोबत देत आहे :



Monday, 2 November 2020

घर असावे घरासारखे

घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती

त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी

त्या अर्थाला अर्थ असावा
नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी
नकोच नुसते पाणी

या घरट्यातुन पिल्लू उडावे
दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती


https://dc.kavyasaanj.com/2020/11/ghar-asawe-gharasarkhe-kavita.html

कवयित्री - विमल लिमये



Monday, 5 October 2020

नको ते त्यांचे नाते

नको मला आपले आता , नको ते त्यांचे नाते ।

दगडांच्या देवता साऱ्या , काळीज नसे त्याते ।।

कुसुमसे काळीज माझे , वाहणे व्यर्थ येथे ।

दगडीच भाव तो त्यांचा , आला कळून माते ।।

ही गर्दी रे गारद्यांची , येथे न कोणी साव ।

मूर्ती अनेक रंगी या , पोटात एक भाव ।।

त्या डोळ्यात जरी दिसला , स्नेहाळ स्वप्न रंग ।

हे उपवन कागदाचे , खोटेच गंध तरंग ।।

इथला वसंत नकली , ही कोकीळ कुठे गाते? ।

कावळे उसन्या स्वरांचे , मी ओळखून त्याते ।।

महापूर मृगजळाचा , भावेल का कोणाते? ।

नको मला असले आता , नको ते त्यांचे नाते ।।

https://dc.kavyasaanj.com/2020/10/nako-tey-tyanche-naate-by-nipanikar.html

कवी - श्री. रामकृष्ण निपाणीकर





Friday, 2 October 2020

ढगाळ वातावरण

ढगाळ वातावरण माझे
मन ढवळत आहे
तू येत असल्याची 
चाहूल  देत आहे

थंडगार वारा हा
अंगाला झोमतो
अन् तुझी आठवण
मोहून टाकतो

आठवणींच काय ग
अस्सच चालायच
एक आली की बाकींनी
न बोलावता यायच्

आज किती दिवस झाले
तू न भेटल्याचे
तरीसुधा मनाचे माझे
‘मन’ नाही विसरण्याचे

मृुग- नक्षत्राचा पाउस 
सरी-सरीने होतो भास 
का कुणास ठाऊक
तुझाच हा आभास

तू मागे वळून न पाहता 
त्या दिवशी अशी गेली
ढगांच्या गडगडटाने मला
आज ‘आठवण’ करून दिली

आज वाहन ‘हत्ती’
आणि हत्तिसारखाच पाउस
तूच माझ्या चित्ती
हे मात्रा फक्त मलाच ठाऊक 

क्षुल्लक होते कारण
क्षुल्लक भांडनसाठी
क्षुल्लक नाही मी, सजनी
अन् तू माझ्यासाठी

पावसाच्या थेंबात माझे
अश्रू विरघळले 
तुझ्या आठवणीत माझे
मन चिंब झाले

डोळे आले भरून 
पाउस पडतो वरुन
ढगाना ही दु:ख असेल (?)
अगदी माझ्यासारखेच असेल

गेल्या वर्षीच्या पावसात 
भिजलो होतो तू अन् मी
अन् यंदाच्या पावसात
आपल्या “आठवणी” अन् मी

आठवणी एक-एक संपल्यानंतर
थांबला बाहेर पाउस
येशील ना ग परतून (?)
दमलो मी वाट पाहून !!!
https://dc.kavyasaanj.com/2020/10/dhagal-vatavaran-majhe-man-kavita.html

कवी - धनंजय चौधरी