Thursday, 8 March 2018

मी एकटीच माझी असते

मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी

येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला नुसते कधीकधी

जपते मनात माझा एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी

मागेच मी कधीची हरपून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी

कवी - सुरेश भट





Tuesday, 6 February 2018

सारेच दीप कसे मंदावले आता

सारेच दीप कसे मंदावले आता
ज्योती विझू विझू झाल्या
की झड घालून प्राण द्यावा पतंगाने
असे कुठेच तेज नाही !
थिजले कसे आवाज सारे?
खडबडून करील पडसाद जागे 
अशी कुणाची साद नाही?
या रे या ! द्या जीव या बाणीवर
अशी वाणी निघत नाही
 भावनाना चेव नाही
यौवना आव्हान नाही
संघर्ष नाही झुंज नाही
जावे ज्या मागे बेधड़क
असा झुंजार वीर नाही
कामी यावा देह जिथे
असा रणसंग्राम नाही !
प्रेतेही उठतील अशा
मंत्राचा उदघोष नाही !
आशांचा हिरमोड
आणि बंडांचा बिमोड
सारीकडे तडजोड
होऊन, सारे कसे सर्दावले आता?
सारेच कसे थंडावले आता !
साऱ्याच आघाड्यावरी ही अशी हो सामसुम !
वरतीखाली सामसूम
इकडेतिकडे सामसूम
आजूबाजूस सामसूम
जनमनांतहि सामसूम
हृदयातहि सामसूम
कुठे पोटतिडिक नाही
प्रेमामधेही धडक नाही
जीव ओढून घेईल अशी
डोळ्यामध्ये फडक नाही
तारुण्याची चमक नाही,धमक नाही
साहित्यात चैतन्य नाही
संगीतात इंगित आणि कलेमध्ये उकल नाही
सरळपणाला भाव नाही
साधा सदाचार नाही
जो तो कसा लाचार आहे
ह्याची त्याला फूस आहे
घराघरात घूस आहे !
तेरी चुप मेरी चुप 
गुपचुप
सारा हिशेबी व्यवहार आहे !
जो तो जागा धरून आहे
नाही तर अडवून आहे
दबेल असून चढेल आहे
योजनांची चळत आहे
परकियांची मदत आहे
तज्ञाचीहि उणीव नाही
आपली जाणीव नाही !
त्याग त्यागिले भोग मागे
दाता दिनयाचना मागे
शील आपले मोल मागे
सौंदर्याची विक्री चाले
कागदांच्या कपटयांवर !
सारीं स्वरूपें कुरूप झाली
हुरूप कशाचा नाही चित्ता !
सारेच दीप कसे मंदावले आता !!

https://dc.kavyasaanj.com/2018/02/sarech-deep-kase-mandavale-by-kavi-anil.html

कवी - अनिल (आत्माराम रावजी देशपांडे)
(काव्यसंग्रह: "कविता शतकाची", शब्द प्रकाशन)  





Sunday, 14 May 2017

सांगेल मी केव्हातरी


का होत आहे स्वप्नवत सारे
का वाहतोय वारा सळसळणारा
का गरजतोय पाऊस आठवणींचा
सांगेल मी केव्हातरी तूला

हल्ली येतात ढग दाटून आभाळात
मग वाहतो सुसाट वारा आठवणींचा
का येतात मग आनंदाश्रूच्या धारा
सांगेल मी केव्हातरी तूला

एक एक आठवणी नंतर मग
चमकतो आसमंत लख्ख प्रकाशात
का घाबरतं मन त्या प्रेमळ विजेला
सांगेल मी केव्हातरी तुला

हळूहळू पावसाचा जोर वाढतो
प्रत्येक थेंबागनित एक उसासा सोडतो
का हरवतो त्या दिवसात नेहमीसारखा
सांगेल मी केव्हातरी तूला

आसमंतात दरवळणारा म्रुदगंध
आणि तुझा होणारा आभास
का वेड लावतो जिवाला
सांगेल मी केव्हातरी तूला

सांगेल मी केव्हातरी तूला
पावसानंतरची शांतता
उद्विग्न झालेल्या मनाची अवस्था
आणि आठवणीसुद्धा

नक्की सांगेल मी केव्हातरी तुला
हसरा चेहरा, रडक्या व्यथा
पाहिलेलं स्वप्न आणि वास्तव सुद्धा
सांगेल मी आठवणीने तुला

- धनंजय चौधरी




Friday, 7 April 2017

प्रेम







प्रेम म्हणजे एक गंमत
तिखट - गोड क्षणांची सुरेख संगत

प्रेम म्हणजे एक मजा
परीक्षा नावाच्या गोष्टीची सजा

प्रेम म्हणजे एक अपेक्षाभंग
अशक्य मिळवण्यात सदैव दंग

प्रेम म्हणजे एक गार वारा
उन्हाळ्यात पाऊस अन गारा

प्रेम म्हणजे एक संधी
कधीतरीच येते दुःखाची मंदी

प्रेम म्हणजे एक सुगंध
अनपेक्षित सुखाचा ऋणानुबंध

प्रेम म्हणजे एक आश्चर्य
कधीच न कळणारे तात्पर्य

प्रेम म्हणजे एक व्यथा
जगण्या - मरण्याची छान कथा

प्रेम म्हणजे एक आशा
पदरी न पडण्याची निराशा

प्रेम म्हणजे एक टोळका
अनेक विचारवंताचा घोळका

प्रेम नावाची गोष्ट
अगदीच क्लिष्ट
काहींसाठी स्पष्ट तर
काहींसाठी कष्ट!!!

- धनंजय चौधरी