Saturday, 4 April 2020

गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या


गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या
कां गं गंगायमुनाहि या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

     उष्ण वारे वाहती नासिकांत 
गुलाबाला सुकविती काश्मिरात, 
  नंदनांतिल हलविती वल्लरीला, 
 कोण माझ्या बोलले छबेलीला 

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे ! भूईवर पडे गडबडून,
कां गं आला उत्पात हा घडून

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
 अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
     गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
      रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला 'लंकेच्या पार्वती' समान
पाहुनीयां, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
'अहा ! आली ही पहा, भिकारीण !'

 मुली असती शाळेतल्या चटोर;
      एकमेकीला बोलती कठोर;
   काय बाई ! चित्तांत धरायाचे
    शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे 

रत्न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.

  पंकसंपर्के कमळ का भिकारी 
       धूलिसंसर्गे रत्न का भिकारी 
     सूत्रसंगे सुमहार का भिकारी 
कशी तूही मग मजमुळे भिकारी 

बालसरिता विधुवल्लरी समान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारि-रत्ने नरवीर असामान्य
याच येती उदयास मुलांतून.

      भेट गंगायमुनांस होय जेथे,
सरस्वतिही असणार सहज तेथे;
   रूपसद्गुणसंगमी तुझ्या तैसे,
भाग्य निश्चित असणार ते अपैसें.

नेत्रगोलांतुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखी करीती;
पाच माणिक आणखी हिरा मोती
गडे ! नेत्रां तव लव न तुळो येती.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
        त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
   तसे गाली हासतां तुझ्या व्हावे,
    उचंबळुनी लावण्य वर वहावे!

गौर कृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
सवे घेउनि तनुवरी अद्धृताचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा !

             काय येथे भूषणे भूषवावे,
विविध वसने वा अधिक शोभवावे 
        दानसीमा हो जेथ निसर्गाची,
 काय महती त्या स्थली कृत्रिमाची!

खरे सारे ! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.

     त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे
   प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;
    विश्वभूषण सौंदर्यलालसा ही
असे मूळातचि, आज नवी नाही!

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !

      तपःसिद्धीचा ’समय’ तपस्व्याचा,
     ’भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा;
       पुण्यवंताचा 'स्वर्ग’ की, कुणाचा,
’मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.

’यशःश्री’ वा ही कुणा महात्म्याची,
’धार’ कोण्या रणधीर कट्यारीची
दिवसमासे घडवीतसे विधाता
तुला पाहुनि वाटते असे चित्ता !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडीं मोत्यांची, फूल सुवर्णाचे,
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परी आवरि हा प्रलय महाभारी !

ढगें मळकट झाकोनि चंद्रिकेला,
तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,
हास्यलहरींनी फोडुनी कपाट
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !

       प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे,
कोड किंचित पुरवितां न ये त्यांचे;
      तदा बापाचे ह्रदय कसे होते,
   न ये वदतां, अनुभवी जाणती ते !

माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा !
प्राप्त होतां परि हे असे प्रसंग
ह्रदय होते हदरोनिया दुभंग !

     देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना 
  लांब त्याच्या गावास जाऊनीयां
          गूढ घेतो हे त्यांस पुसूनीयां !

"गावी जातो" ऐकतां त्याच कालीं
पार बदलूनी ती बालसृष्टि गेली !
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, "येते मी" पोर अज्ञ वाचा !

https://dc.kavyasaanj.com/2020/04/gaai-paanyawr-kay-kavita-by-kavi-b.html
कवी - नारायण मुरलीधर गुप्ते (कवी बी) 


No comments:

Post a Comment