KS Links

Sunday, 21 June 2020

आई, आई ये ना जरा बाबा कडे बघ

आई, आई ये ना जरा बाबा कडे बघ
बाबाच्या डोळ्यांमधे पावसाचे ढग !

बाबा असा बघायला दिसे ना गं बरा
अळिमिळी  गुपचिळी पडलेला वारा !
हले नाही डूले नाही जसा काही फोटो
आवाजही त्याला माझा लांबूनच येतो !
उभा तर उभा आणि बसे तर बसे
हसे तेव्हा अजुनच कसनुसा दिसे !
विचारले - "बाबा काय पाहतोस सांग ?!"
बघे म्हणे- "आभाळाचा लागतो का थांग
काय सांगू पोरी तुला कळणार नाही
आभाळ न आले हाती; जमीनही नाही!
चहूकडे कोंडलेल्या जगण्याच्या दिशा
हाती नाही काम गाडा चालायचा कसा ?
घोडा झालो तरी काही शिकलोच नाही
विकायाच्या जगामधे टिकलोच नाही !"

आणि मग उठोनिया कुशीमधे मागे घेतो
ओले डोळे पुसोनिया ओली पापी घेतो
घाबरतो जीव; बाबा असे काय बोले ?
चित्रातले रंग त्याच्या जसे ओले ओले
चेहऱ्याचा रंग त्याच्या सांग कोणी नेला ?
हसणारा बाबा कुणी पळवून नेला?

आई, आई ये ना जरा बाबा कडे बघ
बाबाच्या डोळ्यांमधे पावसाचे ढग !!!

कवी - संदीप खरे

https://dc.kavyasaanj.com/2020/06/baba-kade-bagh-kavita-by-sandip-khare.html





https://dc.kavyasaanj.com/2020/06/baba-kade-bagh-kavita-by-sandip-khare.html

No comments:

Post a Comment